Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गोट्या भंडलकर यांच्यावर हल्ला करणारे चौघे जेरबंद
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि.11 : गुणवरे, ता. फलटण येथील गुलाब उर्फ गोट्या उत्तम भंडलकर (वय 42) यांच्यावर 28 डिसेंबर 2018 रोजी गोळीबार करून खुनी हल्ला करणार्‍या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पंकज देशमुख म्हणाले, दि. 28 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास गुलाब उत्तम भंडलकर हे गुणवरे येथून बरडकडे मोटर सायकलवरून जात असताना पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांच्यावर गोळीबार करून पलायन केले होते. या घटनेत ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर फलटण व पुणे येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करून यातील आरोपींना तत्काळ जेरबंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना गोपनीय बातमीदारांमार्फत अशी माहिती मिळाली की, गुणवरे येथील कल्याण गावडे यांचा आणि गुलाब भंडलकर यांचा जमिनीच्या कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच हा खुनी हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार विजय कुंभार यांनी दोन पथके तयार करून प्रथम कल्याण दादासाहेब गावडे, रा. गुणवरे, ता. फलटण यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अमर धनराज बेदरे ( वय 22), रा. ता. कर्जत, वैभव सूर्यभान बेदरे (वय 23), रा. सुपे, ता. कर्जत आणि ज्ञानेश्‍वर नारायण साबळे (वय 31), रा. शिंदा, ता. कर्जत, जि. अहमदनगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारणा केली असता कल्याण गावडे यांनी सांगितले, की सन 1986 साली लागू झालेल्या पुनर्वसन कायद्याप्रमाणे त्यांच्या वडील व चुलत्यांच्या नावे असलेली गट नंबर 208 मधील 15 एकर 10 आर इतकी जमीन सन 2000 मध्ये विठ्ठल रांजणे, बबन सपकाळ, साहेबराव रांजणे, सर्व रा. रांजणी, ता. जावली यांच्या नावाने झाली होती, परंतु तेथे पाणी नसल्याने ती जमीन कल्याण गावडे व त्यांचे चुलते खंडाने करीत होते. त्याबाबत त्यांचे लेखी करार झालेले नव्हते, तसेच गट नंबर 208 मधील 70 गुंठे जमीन कल्याण गावडे यांनी साठेखत करून विकत घेतली होती परंतु गट नंबर 208 मधील 70 गुंठे जमीन फिर्यादी गुलाब भंडलकर व त्यांच्या सहकार्‍यांनी दि. 12 जून 2028 रोजी साठेखत करून घेतली. तेव्हापासून कल्याण गावडे व त्यांचे चुलते यांच्या ताब्यातून जमीन पिकासह गुलाब भंडलकर व त्यांच्या सहकार्‍यांनी ताब्यात घेतली होती.
तदनंतर कल्याण गावडे याला फोनवरून शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.
त्याबाबत फलटण पोलीस स्टेशनला गुन्हाही दाखल करण्यात आला होता. गुलाब भंडलकर याने कल्याण गावडे यांच्या ताब्यात असलेली पुनर्वसनातील जमीन साठेखत करून विकत घेऊन ताब्यात घेतली होती. या वादातूनच 10 लाख रुपयांची खुनाची सुपारी देऊन गुलाब भंडलकर यांच्यावर खुनी हल्ला केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपींना ज्ञानेश्‍वर साबळे याने शस्त्र पुरवले असल्याचेही निष्पन्न झाले आहे. याशिवाय इतर आरोपींचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याची शक्यता असून त्याबाबत तपास विजय कुंभार हे करीत आहेत. पत्रकार परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: