Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडाचे म्हसवे येथे बंधार्‍याच्या कामावर गावठी बॉम्बचा स्फोट
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: re1
5कुडाळ, दि. 11 : जावली तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधार्‍याचे काम सुरू असताना अचानक गावठी बॉम्बचा स्फोट होऊन एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. दादासाहेब शामराव चव्हाण (वय अंदाजे 40 वर्षे) असे जखमीचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. परिसरात आणखी काही गावठी बॉम्ब आहेत का, याचा शोध घेण्यासाठी बॉम्बशोधक व नाशक पथक आणि श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, परिसरात आणखी बॉम्ब सापडले नसल्याची माहिती मेढ्याचे सपोनि. जीवन माने यांनी दिली.
दरम्यान, वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने हा बॉम्ब पेरला असावा, असा संशय असून बॉम्ब पेरणार्‍या विरोधात वन विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत जखमी झालेल्या दादासाहेब चव्हाण यांच्या हाताच्या पंजाच्या अक्षरशः चिंध्या झाल्या आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधार्‍याचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे सर्व मजूर सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास बंधार्‍यावर काम करत असताना एका दगडाखाली असलेल्या गावठी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्यात दादासाहेब चव्हाण हे गंभीर जखमी झाले. इतर कामगारांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. हा बॉम्ब त्या ठिकाणी कोणी आणि का आणला होता, 
याबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. जंगल परिसरात आणखी असे गावठी बॉम्ब असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी कसून चौकशी व्हावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. बॉम्बशोधक व नाशक पथकाने तपासणी केल्यानंतर परिसर सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. घटनास्थळी वनमजुराच्या हाताची तुटलेली बोटे आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: