Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हातकणंगलेच्या युवकाचा कराड तालुक्यात निर्घृण खून
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: re3
5कराड, दि. 11 : मालखेड, ता. कराड गावच्या हद्दीत उसाच्या शेतात 22 वर्षीय युवकाचे हात चिकटपट्टीने बांधून गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतची खबर पोलीस पाटलांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात दिली. स्वप्निल गणेश सुतार (वय 22, रा. पेठ वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,   पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत मालखेड गावच्या हद्दीत अशोक जाधव (रा. मालखेड) यांचे उसाचे शेत आहे. त्यांचे बंधू सोमवारी सायंकाळच्या  सुमारास शेतात आले असता त्यांना शेतातील ऊस मोडल्याचे दिसले. त्यांनी उसात जाऊन पाहिले असता त्यांना 22 वर्षाच्या युवकाचा मृतदेह आढळला. जाधव यांनी या घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटलाला दिली. पोलीस पाटील शिवदास यांनी या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी युवकाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे आढळले. त्याच्या जवळ असलेल्या वस्तूंवरून त्याची ओळख पटली. पोलिसांनी या घटनेची माहिती त्याच्या नातेवाइकांना दिली. कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भापकर, प्रकाश राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हलवली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: