Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दिल्लीत वीस हजार कोटींचे हवाला रॅकेट उद्ध्वस्त
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : प्राप्तिकर विभागाने राजधानी दिल्लीतील सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे हवाला रॅकेट सोमवारी उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी  अनेक ठिकाणी छापे टाकून झाडाझडती घेतली. हवाला च्या माध्यमातून पैशांच्या अफरातफरीचा प्रकार सुरू होता.
जुन्या दिल्लीत उद्योग क्षेत्रात गेले काही आठवडे प्राप्तिकर विभागाच्या दिल्ली तपास पथकाकडून टेहळणी सुरू होती. या टेहळणीमुळे हवाला पद्धतीने तीन उद्योग समूहांकडून अवैध पद्धतीने सुरू असलेल्या कारवायांचा माग लागला. त्यानंतर नया बाजार या भागात टाकलेल्या छाप्यात 18 हजार कोटी रुपयांची बनावट बिले सापडली, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने यातील संशयितांची ओळख उघड केली नाही.
दुसर्‍या एका प्रकरणात प्राप्तिकर विभागाने पैशांची अफरातफर करणार्‍या (मनी लाँडरिंग) संघटित टोळ्या शोधून काढल्या. या टोळ्यांचे सदस्य अनेक मोठ्या कंपन्यांची शेअर्सद्वारे फसवणूक करत असल्याचे उघड झाले आहे. आणखी एका टोळीचे विदेशी बँकेत खाते होते. हे लोक निर्यातीच्या किमतीपेक्षा अधिक रकमेची बिले बनवून जीएसटीचाही  खोटा दीर्घकालीन फायदा मिळवल्याचे आणि जीएसटीचा परतावा मिळाल्याचे दाखवत होते.
एका अधिकार्‍याने सांगितले, की सुरुवातीच्या अनुमानावरून ही बनावट निर्यात 1500 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा संशय होता.  मात्र, ते हिमनगाचे एक टोक होते. तिसर्‍या प्रकरणात लोकांना विदेशी यात्रा करण्यासाठी आणि विदेशी चलन उपलब्ध करून देण्यासंबंधीचे पुरावे मिळाले. या प्रकरणांमध्ये करचोरीचे प्रमाण 20 हजार कोटी रुपये असावे, असा अंदाज आहे. हे हवाला रॅकेट गेली काही वर्षे सुरू होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: