Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
खुनाचा प्रयत्न करणार्‍या दोन टोळ्या दोन वर्षासाठी तडीपार
ऐक्य समूह
Friday, April 05, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 4 : भुईंज, ता. वाई आणि वडूज, ता. खटाव येथील मारामार्‍या, खुनाचा प्रयत्न करणार्‍या दोन टोळ्या दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते  कार्यालयातून देण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  भुईज व वाई पोलीस ठाणे हद्दीत मारामारी, दुखापत, खंडणी, खुनाचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा प्रमुख अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (वय 20), रा. भुईंज, ता. वाई, टोळीचा सदस्य यश उर्फ वरुन समरसिंह जाधव (वय 21), रा.भुईंज, ता. वाई यांची टोळी तयार झाली होती. त्यांनी वाई तालुक्यात मारामार्‍या करून, दुखापत, शिवीगाळ व दमदाटी करून नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, शिवीगाळ व दमदाटी करणे असे गुन्हे केले आहेत. त्यांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दोन वर्षे कालावधीकरिता सातारा जिल्ह्यातून हद्दपार केल्याचा आदेश जारी केला आहे.
वडूज पोलीस ठाणे हद्दीत मारामार्‍या, दुखापत, खुनाचा प्रयत्न करणार्‍या टोळीचा प्रमुख युवराज उर्फ यशवंत माधवराव पाटील (वय 40), रा. वडूज, ता. खटाव, टोळीचा सदस्य महेश नारायण गोडसे (वय 37), रा. वडूज, ता. खटाव अशी टोळी तयार झाली होती. त्यांनी खटाव तालुक्यात मारामार्‍या करून दुखापत,   शिवीगाळ, दमदाटी करून नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे केले आहेत. त्यांना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. या दोन्ही टोळीतील सदस्यांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. परिणामी सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. त्यामुळे जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यांच्याकडून सातारा जिल्हा हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी दोन्ही टोळीतील चौघांना हद्दपार करण्याबाबत भुईंज आणि वडूज पोलीस ठाण्यांकडून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली. आदेशाची बजावणी झाल्यानंतर 48 तासात त्यांनी सातारा जिल्हा हद्दीबाहेर गेले पाहिजे असेही आदेशात म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: