Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एअर स्ट्राईक करणार्‍या वीरांना मते समर्पित करा
ऐक्य समूह
Wednesday, April 10, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: mn2
5औसा, दि. 9 (वृत्तसंस्था) : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या तरुणांची संख्या मोठी आहे. या तरुणांना मतदानाचा अधिकार प्रथमच मिळाला असून या नवमतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या आणि पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले करणार्‍या वायुदलाच्या शूरवीरांना आपली मते समर्पित करा, असे आवाहन मोदींनी केले.
दरम्यान, या सभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 महिन्यांनी प्रथमच एकत्र आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजपचे नेते आणि लोकसभेचे उमेदवार उपस्थित होते.
लातूर जिल्ह्यातील औसा येथे भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. तुमचे पहिले मत एअर स्ट्राईक करणार्‍या शूरवीरांना, पुलवामातील शहिदांना समर्पित करा. गरिबांना पक्की घरे मिळावीत यासाठी, शेतकर्‍यांना पाणी मिळावे यासाठी, ‘सर्वांसाठी आरोग्य’ आणि ‘आयुष्यमान भारत’ योजना यशस्वी होण्यासाठी तुमचे मत जायला नको का? समाजाने तुम्हाला बरेच काही दिले आहे. त्यामुळे तुमचे पहिले मत देशासाठी जायला हवे. तुमचे पहिले मत तुम्ही कोणाला दिले, ते आयुष्यभर तुमच्या लक्षात राहील. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा, असे आवाहन मोदींनी केले.
यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवारांना लक्ष्य केले. आज फुटीरतावादी लोकांसोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उभे आहेत. तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहात, हे तुम्हाला शोभते का? राजकारण ही वेगळी गोष्ट आहे. मात्र, पवार हे तिकडे असणे शोभत नाही. ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवाय, त्यांच्यासोबत शरद पवार आहेत.
काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा केली जात नाही; पण पवारांकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत मोदींनी पवारांवर टीका केली. राष्ट्रीय सुरक्षेसाठी आम्ही संकल्प केला आहे. जम्मू-काश्मीरमधून
370 कलम हटविण्यात येणार नाही, असे काँग्रेस म्हणतेय. काँग्रेसचा जाहीरनामा पाकिस्तानची भाषा बोलत आहे. काँग्रेसला
फुटीरतावाद्यांशी चर्चा करायची आहे. सैन्यदलांचे अधिकार कमी करायचे आहेत आणि पाकिस्तानलाही तेच हवे आहे, असा घणाघात
मोदी यांनी केला.
देशद्रोहाचे कलम हटवून काँग्रेस मानवतावादाच्या गप्पा मारत आहे. पण, याच काँग्रेसने बाळासाहेब ठाकरे यांचा मताचा अधिकार काढून घेतला होता. काँग्रेसने आधी स्वत:ला आरश्यात पहावे
आणि मगच मानवतावादाच्या गप्पा माराव्यात. अतिरेक्यांना त्यांच्या घरात घुसून मारणे, ही नव्या भारताची नीती, धोरण आहे.
दहशतवादाचा नायनाट हा आमचा संकल्प आहे. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य होताना दिसत आहे. यापुढे घुसखोरीला लगाम घालू, असे ते म्हणाले.
घराणेशाही चालवणार्‍या राजकीय पक्षांना टोला लगावताना मोदींनी  शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे उदाहरण दिले. मोदी म्हणाले, बाळासाहेबांना वाटलं असतं तर ते स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं असतं. मात्र, त्यांनी तसे केलं नाही. त्यांची त्यागाची भावना असून त्यांच्यासारखं व्हायला पाहिजे, असे मोदी म्हणाले.
चौकीदार चोर आहे, असा प्रचार ते गेल्या सहा महिन्यांपासून करत आहेत. मात्र, प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात काँग्रेसच्या नेत्यांकडून नोटांची बंडले निघत आहेत. मध्य प्रदेशात सत्ता घेऊन सहा महिनेही झाले नाहीत, तोवर त्यांच्या मोठ्या बंगल्यातून करोडोचे धन बाहेर येत आहे. त्यामुळेच त्यांना या चौकीदाराचे भय वाटत आहे, असा टोला मोदींनी लगावला.
भगव्याला विजयी करा : उद्धव ठाकरे
मोदी सरकार पाकिस्तानला नुसते ठोकणार बोलत नाही तर ठोकत आहे. मोदीजी यापुढे पाकिस्तानला कुरापत काढण्याइतकेही शिल्लक ठेवू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे म्हणजे करायचे. समर्थ, संपन्न हिंदुस्थानसाठी भगव्याला विजयी करा. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात विमा कंपन्यांचे कार्यालय असले पाहिजे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. रझाकारांच्या वेळी वल्लभभाई मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिले. सैन्य घुसवण्याच्या निर्णयावर कायम राहिले तसेच मोदीजी तुम्ही मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहा, असे उद्धव म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे प्रशस्तीपत्रकही त्यांनी दिले. भाजपच्या जाहीरनाम्याचे कौतुक करताना काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे थापा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: