Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विकासकामे थांबविण्याची भाषा करणाराला जागा दाखवू : मुख्यमंत्री
ऐक्य समूह
Thursday, April 11, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: mn1
5फलटण, दि. 10 : निवडणुका आल्या की विकासकामे थांबविण्याची, व्यक्तिगत अडवणुकीची भाषा केली जाते, धमक्या दिल्या जातात. आता तशी हिंमत कोणी करणार नाही. कोणाची ताकतही नाही. तसा कोणी प्रयत्न केला, लोकशाहीत ठोकशाहीचा वापर झाला तर त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप-सेना मित्रपक्षांचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ येथील घडसोली मैदान परिसरात आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, राज्याचे महसूल मंत्री  चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर, डॉ. दिलीप येळगावकर, माजी आमदार बाबुराव माने, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. नारायण पाटील, माळेगावचे चेअरमन रंजनकाका तावरे, दिगंबर आगवणे, अनिल देसाई, डॉ. विष्णुपंत त्रिपुटे, सह्याद्री कदम, जयकुमार शिंदे, उत्तमराव जानकर यांच्यासह भाजप, सेना, राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय आदी राजकीय पक्षांचे जिल्हा, तालुकास्तरीय पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेचे सदस्य आणि मतदार उपस्थित होते.
देशातील विविध 42/48 नेत्यांनी महागठबंधन करून हातात हात घालत एकीची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी पायात पाय अडकवून एकमेकांना रोखण्याचा त्यांचा प्रयत्न कोणाचा पायपोस कोणात नसल्याचे स्पष्ट झाले. नेता ठरविताना अनेक नावे पुढे आली. त्यामध्ये शरद पवार, मायावती, अखिलेश आदी अनेक नावांचा समावेश होता. त्यातून पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणार्‍या या लोकांना पंतप्रधान मोदींचा झंझावात पाहून निवडणुकीस सामोरे जाण्याची हिंमत होत नव्हती आणि म्हणूनच माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा करणार्‍या कॅप्टन शरद पवार यांनी माघार घेतली. आमचा नेता ठरला, तुम्हाला मात्र आठवड्याच्या प्रत्येक दिवशी शरद पवार, मायावती, अखिलेश वगैरेंची निवड करावी लागेल, अशी खिल्ली मुख्यमंत्र्यांनी महागठबंधन बाबत बोलताना उडविली.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील शासनाने 5 वर्षात भारत बदलण्याचे काम केले.
 सामान्यांच्या विकासाला प्राधान्य देत शेती, सामाजिक न्याय, मुद्रा योजना, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा, अशा अनेक योजनांद्वारे जे 15 वर्षात घडले नाही ते 5 वर्षात करून दाखविले.  गरिबी हटाओचा नारा देत प्रत्येकाला 72 हजार रुपये देण्याची घोषणा करणार्‍या राहुल गांधींचे पणजोबा, आजी, वडील, आई यांनी गरिबी हटावसाठी घोषणा केल्या. मात्र, प्रत्यक्षात गरिबी हटविताना सामान्य माणूस गरिबीतच राहिला यांच्या चेल्या चपाट्यांची मात्र गरिबी हटल्याचे स्पष्ट करत पंतप्रधान मोदींनी जनधन बँक अकौंटद्वारे 34 कोटी लोकांना लाभ देत नवी व्यवस्था निर्माण केली. शेती, सामाजिक न्याय व घरकुलासाठी मध्यस्थाशिवाय थेट गरिबांपर्यंत लाभ पोहोचणार्‍या योजना राबविल्या. 2022 पर्यंत या देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही, अशी घोषणा करत प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीरीतीने राबवून 10 लाख घरांची उभारणी करण्याचे नियोजन केले. त्याप्रमाणे 2022 नव्हे 2021 पर्यंत या देशात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. गरिबांच्या जीवनात परिवर्तन करण्याची भूमिका घेणार्‍या पंतप्रधानांनी प्रत्येक कुटुंबाकडे शौचालय असले पाहिजे, अशी घोषणा केली. त्यावेळी देशातील केवळ 45 टक्के कुटुंबांकडे शौचालये होती. माता-भगिनींना सूर्योदयापूर्वी शौचाला जावे लागत असे. त्यातून त्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेवून राबविलेल्या योजनेद्वारे 5 वर्षात 98 टक्के कुटुंबांकडे शौचालये उभारण्याची योजना यशस्वी झाली. गरिबी हटावचा नारा न देता प्रत्यक्ष काम करण्याच्या भूमिकेतून मुद्रा योजनेद्वारे देशातील 12 कोटी लोकांना विनातारण, बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे, स्वयंपाकासाठी चुलीचा वापर करून स्वत:चे आरोग्य धोक्यात घालणार्‍या महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत वृद्धांना 3 हजार रुपयांपर्यंत निवृत्ती वेतन देण्याची, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांना निवृत्ती वेतन देण्याचा विचार पंतप्रधानांनी केला आहे. त्यापूर्वी न खाऊंगा न खाने दुंगा या घोषणेच्या आधारे शेतकरी व अन्य समाज घटकांना मध्यस्थाशिवाय त्यांच्या बँक अकौंटवर थेट अनुदान जमा करण्याची योजना भारत सरकारने प्रभावीरीतीने राबविल्याचे मुख्यमंत्र्यांनी निदर्शनास आणून दिले. सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्टा सुजालाम सुफलाम करण्याबरोबरच राज्याच्या वाट्याचे पाणी अडविण्यासाठी तत्कालीन युती सरकारने ठोस भूमिका घेवून कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना तत्कालीन खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या मागणीनुसार केली आणि राज्याच्या वाट्याचे पाणी अडविण्यात यशस्विता मिळविली. त्यानंतरच्या 15 वर्षात या दुष्काळी पट्ट्यातील पाटबंधारे प्रकल्प निधीअभावी अपूर्ण राहिले. गेल्या 4 वर्षात केंद्र व राज्यात पुन्हा सत्तारूढ झालेल्या युती सरकारने या प्रकल्पासाठी पुरेसा निधी देवून अपूर्ण प्रकल्प पूर्ण तर केलेच त्याचबरोबर जलयुक्त शिवार आणि अपूर्ण पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करून वाढविलेल्या सिंचन क्षमतेद्वारे या 3/4 जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्टा सुजलाम सुफलाम करण्याची मागणी पूर्ण केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प निहाय खर्चाची आकडेवारी देवून स्पष्ट केले. सभेत नीरा-देवघर पाटबंधारे प्रकल्प, लोणंद-फलटण-बारामती रेल्वे प्रकल्पाची पूर्तता आणि न्यू फलटण शुगर वर्क्सबाबत योग्य तोडगा काढण्याची मागणी करण्यात आल्याचे नमूद करत लवकरच नीरा-देवघरसाठी निधीची तरतूद करून या प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्राशिवाय अन्यत्र जाणार नाही याची ग्वाही देतानाच कृष्णा-भीमा स्थिरीकरण आणि फलटण-बारामती रेल्वे मार्गाची पूर्तता करून या भागाच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याची ग्वाही देतानाच एकट्या माढा लोकसभा मतदारसंघात सध्या 8 हजार कोटी रुपये खर्चाची रस्त्याची कामे सुरू आहेत. रेल्वे प्रकल्पही आता कोणी अडविणार नाही. केवळ फलटण-बारामतीच नव्हे या भागात रेल्वेचे जाळे उभारून दळणवळणाच्या मुबलक सोई उपलब्ध करून देतानाच या भागातील नेत्याने देशाचे नेतृत्व केले. परंतु या भागावर सतत अन्याय केला. या भागाचे प्रश्‍न प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या 4 वर्षात या सर्व प्रश्‍नांबाबत युती सरकारने घेतलेल्या भूमिकेतून 15 वर्षात झाले नाही ते 4 वर्षात मार्गी लागल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यातून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्याचे स्पष्ट करत आता रणजितसिंह नाईक-निंबाळकर खासदार होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.  रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना निवडून देणे एवढेच काम या मतदारसंघात किंवा संपूर्ण लोकसभा निवडणुकीत होणार नाही तर ही निवडणूक देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारी, राष्ट्रीय अस्मिता सांभाळणारी, देश स्वाभिमानी असल्याची ग्वाही देणारी आणि हे सर्व कोणाच्या हातात देणार, सक्षम नेतृत्वाला पाठिंबा देणार की नाही या प्रश्‍नांची उत्तरे देणारी असल्याने या निवडणुकीचा निकाल मतदारांनी निवडणूक जाहीर झाली त्याच दिवशी घेतला आहे. विकासाची दृष्टी आणि त्याची पूर्तता करण्याची क्षमता असलेल्यांनाच दिल्लीत पाठविण्याचा निर्णय देशातील जनतेने घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. परकीय आक्रमणे रोखण्याची किंबहुना या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणाची होणार नाही इतकी क्षमता भारतीय सैन्य दलात होती, आजही ती कायम आहे. परंतु  यापूर्वीच्या नेतृत्वात तशी हिंमत नसल्याने सैन्यदल आदेशाशिवाय काही करू शकले नाही. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तशी हिंमत असल्यानेच पाकिस्तानने वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न करताच तेथील अतिरेक्यांना धडा शिकविण्यात भारतीय सैन्यदल यशस्वी झाले. अमेरिका, इस्त्राईल पाठोपाठ  क्षमता असणारा देश म्हणून आज हिंदूस्थानकडे पाहिले जाते. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यावर प्रचंड टीका करत या जाहीरनाम्यातून यांची दृष्टी स्पष्ट होत असल्याचे नमूद करीत हा जाहीरनामा काँग्रेसचा आहे की  जैश-ए-मोहम्मदचा, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राचा हा मुख्यमंत्री आपल्या मर्जीने कोठे जावे हे ठरवितो. त्याला कोणी रोखू शकत नाही. आपली आजची सभा कोणी तरी विरोध केल्याने रद्द झाल्याची अफवा यापुढे कोणीही ऐकू नका, असे आवाहन करत या निवडणुकीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या गळ्यात विजयाची माळ घालून त्यांना दिल्लीला पाठवेपर्यंत मीच काय व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील कोणीही थांबणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात देत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत करमाळा, माढा, माळशिरस, सांगोला या विधानसभा मतदारसंघातून आपल्याला मताधिक्य मिळणार आहे. मात्र, फलटणकरांना अनेक वर्षानंतर आपला प्रतिनिधी दिल्लीत पाठविण्याची संधी लाभली आहे. त्याचे सोने करणार की नाही, असा सवाल करत माजी खासदार रणजितसिंह  मोहिते-पाटील यांनी पाणी हा या भागातील महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी कृष्णा-भीमा स्थिरीकरण, नीरा-देवघर, उरमोडी, धोम-बलकवडी आदी प्रलंबित प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. भाजप-सेना शासनाने माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या आग्रहाखातर या प्रश्‍नांची सोडणवूक करण्याला प्राधान्य दिले. त्यानंतर 15 वर्ष हे प्रश्‍न प्रलंबित राहिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सरकारने या प्रश्‍नांना प्राधान्य दिल्याने अनेक कामे मार्गी लागली. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणासारखे अनेक जटील प्रश्‍न त्यांनी लीलया सोडविले. असे खंबीर, कर्तृत्ववान, विश्‍वासू नेतृत्व आपल्या पाठीशी असल्याने या भागाचे प्रश्‍न आता प्रलंबित राहणार नाहीत याची ग्वाही मोहिते -पाटील यांनी दिली. सकारात्मक काम करण्याची आपली भूमिका असून कोणामागे भुंगा लावणे, कोणाला अडचणीत आणण्यात आपल्याला बिलकुल स्वारस्य नाही. याद्वारे नीरा-देवघर आणि लोणंद, फलटण, बारामती या प्रलंबित रेल्वे मार्गाची, नाईकबोमवाडी येथील मंजूर औद्यागिक वसाहतीची पूर्तता करण्याला प्राधान्य देण्याची ग्वाही देत न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याचा प्रश्‍न सोडवून घेवून शेतकर्‍यांचे पैसे मतदानापूर्वी त्यांना मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्नशील अअसल्याचे युवा नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीसह बारामतीची ताकद आपल्या पराभवासाठी प्रयत्नशील असली तरी फलटण किंवा माढ्यातील मतदारांपेक्षा बारामतीची ताकद मोठी नसल्याचे नमूद करीत या जनतेच्या ताकदीवर आपण विजयी होणार आहोत. आ. जयकुमार गोरे यांनी आमदारकी पणाला लावली आहे. अन्य तालुक्यातही सर्वसामान्य माणसासह पदाधिकारी, कार्यकर्ते सक्षमपणे आपल्या पाठीशी उभे राहिले आहेत. कोणता तालुका अधिक लीड देणार यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. आपला विजय निश्‍चित असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह सर्व नेते, कार्यकर्ते यांचेच श्रेय अधिक असल्याचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. यावेळी  केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, उत्तमराव जानकर, दिगंबर आगवणे आदींची आपली भूमिका स्पष्ट करणारी भाषणे झाली. अ‍ॅड. नरसिंह निकम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. नगरपरिषदेतील विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी आभार मानले.
80 हजार कोटी गरिबांना दिले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनधनसारख्या योजनांद्वारे 80 हजार कोटी गरिबांच्या खात्यात जमा केले. या उलट पूर्वीचे पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी 1 रुपया उपलब्ध करून दिल्यावर त्यातील 85 पैसे व्यवस्था, भ्रष्टाचार यामध्ये जातात आणि सर्वसामान्यापर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, अशी कबुली दिल्याचे सर्वश्रुत आहे, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.
माजी अधिकारी, उद्योजकांचा भाजप प्रवेश
निवृत्त सनदी अधिकारी विश्‍वासराव भोसले, उद्योजक हणमंतराव मोहिते, डॉ. मधुकर माळवे, माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ननावरे, टेंभुर्णी येथील संजय पाटील यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करताना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल अभिनंदन केले.
डॉक्टरांचा विशेष सन्मान
आरोग्य सुविधा विशेषत: टेस्ट ट्यूब बेबीसारखी अत्याधुनिक संकल्पना फलटणसारख्या छोट्या शहरात यशस्वी करणार्‍या डॉ. सागर माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
आगवणेंवरील केसेस काढून टाकल्या
दिगंबर आगवणे यांना सभा स्थानी येण्यास मज्जाव करण्यात आला. त्यावेळी हस्तक्षेप करत त्यांच्यावरील सर्व केसेस काढून टाकण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करीत त्यांना व्यासपीठावर जाण्यास मज्जाव न करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर तालुक्यातील चुकीचे निर्णय आणि सर्वसामान्यांची गळचेपी मुख्यमंत्र्यांकडून रोखली जाईल, असा विश्‍वास आगवणे यांनी व्यक्त केला.
...तर खासदारकीचा राजीनामा देईन
अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणार्‍या, आपले अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न करणार्‍यांना वाकडे बोलणार नाही; परंतु लोकांचे प्रश्‍न सोडवताना कोणी आडकाठी आणली तर त्यांची गय करणार नाही. लोकसभेत जाऊन लोकांच्या प्रश्‍नाला प्राधान्य देण्याची आपली भूमिका राहील. मात्र, लोकांचे प्रश्‍न सुटले नाहीत तर खासदारकीचा राजीनामा देऊ, असे भावनिक वक्तव्य रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.
रामदास आठवलेंची चूक
नेहमीप्रमाणे शेरोशायरी आणि काव्यपंक्तीद्वारे भाषणाला सुरुवात करणार्‍या केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी बोलण्याच्या ओघात रामराजेंच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करताच उपस्थितांनी एकच हलकल्लोळ केला. चूक लक्षात येताच आठवले यांनी रणजितसिंहांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीने फसवले
काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्याला फसविले. आता ते समाजाला फसवित आहेत. भाजप-शिवसेने शिवाय आपल्याला सन्मान लाभणार नसल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: