Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधींच्या जीवाला धोका नाही
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : अमेठी येथे बुधवारी झालेल्या रोड शोमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या डोक्यावर दिसलेला हिरवा प्रकाश म्हणजे लेझर लाईट नसून काँग्रेसच्या एका फोटोग्राफरच्या मोबाईल कॅमेर्‍याचा लाईट होता, असे सांगत त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने आज स्पष्ट केले.
उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी शक्तिप्रदर्शन करत दोन तास रोड शो केला. त्यांच्यासोबत त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा, मेव्हणे रॉबर्ट वड्रा आणि त्यांची दोन मुले रेहान व मिराया हीदेखील उपस्थित होती. यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी मात्र रोड शोमध्ये सहभागी नव्हत्या. राहुल गांधी हे उमेदवारी अर्ज भरत असताना सोनियांनी उपस्थिती लावली होती.
हा रोड शो सुरू असताना राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी कोणी तरी त्यांच्या डोक्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट मारल्याची शंका काँग्रेसने व्यक्त केली. ही हिरवी लाईट स्नायपर गनची असल्याचीही शंका होती. या प्रकाराबाबत काँग्रेसने चिंताही व्यक्त केली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांना याबाबतचे पत्र लिहिल्याचेही सांगितले गेले होते. मात्र,  तपासात राहुल गांधींच्या डोक्यावर मारलेला लेझर लाईट मोबाईल कॅमेर्‍याचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुल गांधी यांना विशेष सुरक्षा गटाची (एसपीजी) सुरक्षा पुरवण्यात येते.
हा प्रकार गृह मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर विशेष सुरक्षा गटाच्या (एसपीजी) संचालकांना या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. या प्रकाराची व्हिडिओ क्लिप बारकाईने तपासल्यानंतर ती हिरवी लेझर लाईट अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या एका फोटोग्राफरच्या मोबाइल कॅमेर्‍याची असल्याचे समोर आले. राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधत असताना तो फोटोग्राफर त्याचे चित्रीकरण करत होता, असे एसपीजीच्या संचालकांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला सांगितले. दरम्यान, याबाबत काँग्रेसने गृह मंत्रालयाला कोणतेही पत्र दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: