Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यात शांततेत मतदान
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 10:54 AM (IST)
Tags: mn1
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : देशातील लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात, म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. 18 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील मिळून 91 मतदारसंघांमध्ये आज मतदान झाले. आंध्र प्रदेशात दोन राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारात दोन जण ठार झाले. महाराष्ट्रात आणि ओडिशात एका ठिकाणी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला. असे अपवाद वगळता मतदानाला कोठेही गालबोट लागले नाही. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएममध्ये झालेला बिघाड आणि काही ठिकाणी मतदारांची नावे गायब झाल्याने गोंधळ उडाला. बिघडलेल्या मतदान यंत्रांच्या जागी दुसरी मतदान यंत्रे उपलब्ध करून दिल्यानंतर मतदान सुरळीत झाले.
पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेशातील सर्व 25, तेलंगणातील 17, उत्तराखंडमधील पाच, महाराष्ट्रातील सात, मेघालयातील दोन, अरुणाचल प्रदेशातील दोन, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप येथील प्रत्येकी एक, उत्तर प्रदेशातील आठ, आसाममधील पाच, बिहार व ओडिशातील प्रत्येकी चार, जम्मू-काश्मीर आणि पश्‍चिम बंगालमधील प्रत्येकी दोन, छत्तीसगड, त्रिपुरा, मणिपूर येथील प्रत्येकी एका जागेसाठी आज मतदान झाले. नागालँड, मिझोराम, सिक्कीममध्ये सरासरी अनुक्रमे 78, 60 व 69 टक्के, मणिपूर, त्रिपुरात अनुक्रमे 78.2, 81.8, आसाममध्ये सरासरी 68, पश्‍चिम बंगालमध्ये 81, उत्तर प्रदेशात 64, महाराष्ट्रात 55.97, जम्मू-काश्मीरमध्ये सरासरी 54.49 टक्के, छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बस्तर भागात सरासरी 57 टक्के, आंध्र प्रदेशात 73 टक्के, असे मतदान झाले.        
काही ठिकाणी ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे गोंधळ उडाला होता. मात्र, तेथे तातडीने नवी मतदान यंत्रे उपलब्ध करून देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.
आंध्र प्रदेशात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या गटात तुफान धुमश्‍चक्री झाली. यामध्ये टीडीपीचे सिद्दा भास्कर रेड्डी आणि वायएसआर काँग्रेसचे पुल्ला रेड्डी या दोन स्थानिक नेत्यांचा मृत्यू झाला आहे. अनंतपूर जिल्ह्यातील मीरापुरम येथे हा राडा झाला. सिद्दा भास्कर रेड्डी टीडीपीचे डमी एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप करत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भिडले. आधी शाब्दिक चकमक झाली. काही वेळातच कार्यकर्त्यांनी एकमेकांना काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष कोडेला शिवप्रसाद राव यांना गुंटूर जिल्ह्यात वायएसआर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. अनंतपूर जिल्ह्यातील गुंटकल विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर जनसेना पक्षाचे उमेदवार मधुसूदन गुप्ता मतदान कऱण्यासाठी गेले असता त्यांनी ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आपटले. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचं नाव योग्य प्रकारे दिले जात नसल्याने गुप्ता नाराज होते. त्यावरून त्यांनी मतदान केंद्रावरील कर्मचार्‍यांशी वाद घातला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोकड, अंमली पदार्थ व दारू जप्त
दरम्यान, पहिल्या टप्प्याचा प्रचार सुरू असताना निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी देशभरात तब्बल 607 कोटी रुपयांची रोकड, 198 कोटी रुपयांची दारू, 1091 कोटींचे अंमली पदार्थ, 486 कोटी रुपयांचे मौल्यवान धातू, 48 कोटी रुपयांच्या वस्तू असा मुद्देमाल जप्त केला आहे. निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपवर आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तब्बल 70 हजार तक्रारी नोंदवण्यात आल्याची माहिती आयोगाच्या सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: