Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांजला अटक
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: mn3
5लंडन, दि. 11 (वृत्तसंस्था) : अमेरिकेसह अन्य देशांची गोपनीय राजनैतिक व लष्करी कागदपत्रे उघड करून जगभरात खळबळ उडवून देणारा ‘विकिलीक्स’चा संस्थापक ज्युलियन असांज याला ब्रिटिश पोलिसांनी आज लंडनमध्ये अटक केली. त्याला इक्वेडोरच्या दूतावासातून ताब्यात घेण्यात आले. इक्वेडोरच्या राजदूतांच्या सूचनेनंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती ब्रिटिश पोलिसांनी दिली.  
राजनैतिक आणि लष्कराची गोपनीय कागदपत्रे उघड करणार्‍या असांजने अटकेच्या भीतीनं लंडनमध्ये इक्वेडोरच्या दूतावासात 2012 साली राजकीय आश्रय घेतला होता. तेव्हापासून तो या दूतावासात रहात होता. आपले स्वीडनकडे प्रत्यार्पण होईल आणि स्वीडिश सरकार आपल्याला अमेरिकेच्या ताब्यात  देईल, या भीतीने असांजने तेव्हापासून दूतावास सोडला नव्हता. मात्र, अखेर आज त्याला ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. 47 वर्षीय असांजला आज मेट्रोपॉलिटन पोलिसांनी इक्वेडोरच्या दूतावासातून अटक केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिली. इक्वेडोरच्या ब्रिटनमधील राजदूतांनी पोलिसांना दूतावासात बोलावून घेतले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. अटकेनंतर त्याला मध्य लंडनमधील पोलीस ठाण्याच्या कोठडीत नेण्यात आले. त्यानंतर त्याला वेस्टमिनिस्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयात हजर करण्यात आले. असांजने इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष लेनिन मोरेनो यांच्या खाजगी आयुष्यातील गोष्टी फोडल्याचा आरोप तेथील सरकारने केला. त्याने राजकीय आश्रयाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने इक्वेडोर सरकारने त्याचा आश्रय काढून घेताला. मात्र, जेथे शारीरिक छळ अथवा मृत्युदंडाची शिक्षा होईल, अशा देशाकडे त्याचे प्रत्यार्पण ब्रिटनने करू नये, अशी मागणी आपण केल्याचे मोरेनो यांनी सांगितले. ब्रिटन सरकारनेही त्यांच्या नियमांनुसार याबाबत लेखी हमी दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली स्वीडनला हवा असलेल्या असांजने प्रत्यार्पण टाळण्यासाठी इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: