Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सम्राट निकम खून प्रकरणातील फरार संशयित धीरज शेळके याला अटक
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 11 : कोडोली, ता. सातारा येथील हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा सम्राट विजय निकम (वय 27) याच्या खून प्रकरणातील फरार संशयित धीरज शेळके याला आज अटक करण्यात आली. जकातवाडी येथील एका हाफ मर्डर केसमध्येही त्याचा सहभाग होता. दरम्यान 307 मधील बंटी जाधव यालाही आज जेरबंद करण्यात आले. सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल सम्राट ढाब्याच्या मालकाचा मुलगा सम्राट निकम (वय 27) हा दि.15 जानेवारी 2019 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास कोडोली येथील पेट्रोल पंपावरून दुचाकीवरून कोडोलीकडे निघाला असता सातारा- रहिमतपूर मार्गावर दत्त चौका नजीक एका टोळक्याने त्याची दुचाकी अडवून त्याच्यावर हॉकी स्टिकने जोरदार हल्ला केला होता. सम्राट याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोर एकामागोमाग वार करत होते. या हल्ल्यात सम्राट याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला व तो जागीच कोसळला. हल्ल्यानंतर हल्लेखोर हॉकी स्टिक तेथेच टाकून पळून गेले. सातारा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सम्राट याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या हल्ल्याने संतप्त झालेल्या सम्राट निकम याच्या कुटुंबातील सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत खून प्रकरणातील संशयितांना अटक केल्याशिवाय सम्राटचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी सम्राट निकम याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर निकम कुटुंबीयांनी सम्राट याचा मृतदेह ताब्यात घेतला होता.
दुसर्‍या दिवशी सम्राट निकम खून प्रकरणी संजय वसंतराव निकम, रा. कोडोली, ता. सातारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मयूर राजेंद्र जाधव, सौरभ खरात उर्फ कुक्या, धीरज शेळके,   संग्राम दणाने, बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय दिनकर जाधव, बाळासाहेब तांगडे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यातील काही जणांवर अटकेची कारवाई केली होती. मात्र, धीरज शेळके हा फरार झाला होता. आज त्याला अटक करण्यात सातारा पोलीस ठाण्यातील पोलिसांना यश आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: