Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अम्मा भगवानांच्या मंदिराच्या नावाखाली भाविकांना लाखोंचा गंडा
ऐक्य समूह
Friday, April 12, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: re1
सहा जणांना अटक व पोलीस कोठडी
5फलटण, दि. 11 : चेन्नई येथील अम्मा भगवान या भाविकांना दर्शन देण्यासाठी फलटण येथे येणार आहेत. त्यांचे मंदिर बांधायचे आहे, असे सांगून 250 ते 300 लोकांकडून लाखो रुपये उकळल्याच्या आरोपावरून फलटण पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांनी दिली.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यात दि. 9 डिसेंबर 2018 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाविकांची दिशाभूल करून लाखो रुपयांची माया जमवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद मधुकर डांगरे, जयश्री संभाजी भोसले, विठ्ठल सोनवणे (पूर्ण नाव माहीत नाही), संगीता सोनवणे (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व रा. सांगवी, पिंपळे निलख, पिंपरी- चिंचवड, पुणे), मुकुंद वामने (पूर्ण नाव माहीत नाही) व विकास ढोले (पूर्ण नाव माहीत नाही, रा. हडपसर, पुणे) यांना अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यांच्यावर लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
याबाबत पोलिसांनी चेन्नईतील स्वतः अम्मा भगवान यांच्याकडे चौकशी केली असता, आम्ही कुठेही दर्शनासाठी जात नसून आमच्या नावावर पैसे वसूल करण्यात येत असल्यास पोलिसांकडे तक्रारी दाखल कराव्यात, असे आवाहन त्यांनी केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक देसाई यांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: