Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विद्यानगर येथे आई, वडील व विवाहित मुलीची आत्महत्या
ऐक्य समूह
Saturday, April 13, 2019 AT 11:39 AM (IST)
Tags: re1
5कराड, दि. 12 ः विद्यानगर, ता. कराड येथे गुरूदत्त कॉलनीतील दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या मुलीने माहेरील घरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. या घटनेने हादरलेल्या तिच्या आई-वडिलांनी घरातच सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या घटनेने विद्यानगर परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाजी आनंदा मोहिते (वय 59), सौ. बेबी शिवाजी मोहिते (वय 43), दोघेही रा. गुरूदत्त कॉलनी, विद्यानगर, मूळ रा. कोरिवळे-उंब्रज, ता. कराड व वृषाली विकास भोईटे (वय 23), रा. वाघोली, ता. कोरेगाव अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  शिवाजी मोहिते यांचे कोरिवळे-उंब्रज मूळ गाव आहे. मात्र शिवाजी मोहिते कराड एस. टी. आगारात नोकरीस होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे ते विद्यानगर भागातील गुरूकृपा कॉलनीत अनेक वर्षापासून राहत आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा नोकरीनिमित्ताने पुणे येथे असतो. मुलगी वृषाली हिचा दोन महिन्यापूर्वी नऊ फेब्रुवारी रोजी विवाह झाला होता. कोरेगाव तालुक्यातील वाघोली हे तिचे सासर होते.         
वृषाली मागील आठवड्यात तिच्या माहेरी आली होती.
शुक्रवारी दुपारी आई-वडील घरात असताना वृषालीने विष प्राशन केले. तिच्या आई-वडिलांनी तिला हलवून पाहिले असता वृषाली काहीच बोलत नसल्याने तिचा मृत्यू झाल्याची त्यांना खात्री पटली. या घटनेने वृषालीच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यावेळी त्यांनी त्यांचा पुणे येथे असलेला मुलगा विराज यास फोन करून वृषालीने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली. त्यावेळी आई-वडिलांनी रडारड सुरू केल्याने विराजने आपल्या मित्रांना फोन करून घरी जाण्यास सांगितले. ते मित्र घरी पोहोचेपर्यंत विराजच्या आई-वडिलांनी सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कराड येथील उपजिल्हा रूगणलयात पाठवून दिले. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: