Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शरद पवारांचा राष्ट्रवाद कोठे गेला?
ऐक्य समूह
Saturday, April 13, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: mn1
काँग्रेसची फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी : मोदी
5अहमदनगर, दि. 12 (वृत्तसंस्था) : काँग्रेस-राष्ट्रवादीने फुटीरतावाद्यांशी हातमिळवणी केली आहे. काँग्रेसने वर्षानुवर्षे हेच काम केल्याने त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत. मात्र, शरद पवारांना काय झालंय? त्यांचा राष्ट्रवाद गेला कुठे? केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांनी पक्षाचे नाव राष्ट्रवादी ठेवले का? विदेशीच्या मुद्द्यावर पवारांनी काँग्रेस सोडली होती तर आता पुन्हा त्यांच्यासोबत का गेलात, असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पुन्हा हल्लाबोल केला.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे-पाटील आणि शिर्डीचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मोदींची नगरमध्ये सभा झाली. सभेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खा. दिलीप गांधी, भाजप, शिवसेना व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या सभेत मोदींनी पवारांवर पुन्हा निशाणा साधला. ते म्हणाले, काँग्रेस फुटीरतावाद्यांसोबत आहे. त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही. मात्र, शरद पवारांना काय झाले आहे? ते त्यांच्यासोबत कसे? पवारांनी देशाच्या स्वाभिमानाच्या कारणावरून काँग्रेस सोडली होती. पुन्हा त्यांच्यासोबत कशी काय हातमिळवणी केली? तुम्हीही विदेशी चष्म्यातून देशाकडे पाहता का? आपल्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी ही केवळ धूळफेक आहे का? अशा फुटीरतावाद्यांना साथ देताना शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या पवारांना झोप तरी कशी येते? आता देशात दोन पंतप्रधान होण्याची भाषा होत असताना तुम्ही कधीपर्यंत गप्प राहणार?
पूर्वीचे काँग्रेसचे सरकार आणि आताचे भाजपचे सरकार यांच्या कामाची तुलना करताना मोदींनी काँग्रेसवर तुफान टीका केली. त्या काळातील प्रत्येक दिवस घोटाळ्याचा होता.        
ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत होते. आमच्या सरकारच्या काळात कठोर भूमिका घेतल्याने हे प्रकार थांबले आहेत. काँग्रेस सरकार कमकुवत होते. आता जगात देशाची मान उंचावली आहे. अतिरेक्यांना घरात घुसून मारण्याची क्षमता आपण सिद्ध केली आहे. आता देशात पुन्हा आमचे सरकार येणार आहे. यापेक्षाही चांगली कामे करून दाखवणार आहोत. काँग्रेसला पूर्णपणे हद्दपार केल्याशिवाय या देशाचा विकास होणार नाही. हे काम जनतेने करून दाखवावे, असे आवाहन मोदींनी केले.
हे पक्ष भारताला आणि महाराष्ट्राला लुटत आहेत. हे लोक गरीब शेतकर्‍यांचे दुश्मन आहेत. त्यांनी आजवर सर्वांना फक्त जखमा दिल्या आहेत. त्यांना आता त्यांची जागा दाखवण्यासाठी तुमच्या मतांची गरज आहे. आपले एक मत या चौकीदाराला मजबूत करेल, असे मोदी म्हणाले. पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकर्‍यांसाठी पाण्याच्या नियोजनासाठी आम्ही वेगळे मंत्रालय तयार करणार आहोत. शेतकरी कृषी योजनेत बदल करणार आहोत. 60 वर्षांवरील शेतकर्‍यांना पेन्शन देणार आहोत. उसापासून इथेनॉल निर्मितीला बळ देणार आहोत. सैन्याच्या कारवाईचे राजकीय श्रेय घेण्यावरून देशात वातावरण तापलेले असताना मोदींनी या सभेत पुन्हा एकदा नवमतदारांना राष्ट्रभक्तीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड तुम्हाला मंजूर आहे का? शूर जवानांसाठी तुमचे पहिले मत समर्पित करा, असे आवाहन त्यांनी नवमतदारांना केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. खा. दिलीप गांधी यांनी चांगली कामे केली असली तरी निवडणुकीची रणनीती म्हणून काही निर्णय घ्यावे लागले. त्यांना उमेदवारी मिळाली नाही, म्हणून त्यांनी नाराज होऊ नये. डॉ. सुजय विखे यांच्या रूपाने आपण काँग्रेसवर ‘सर्जिकल स्ट्राइक’ केला आहे, असे ते म्हणाले.
राधाकृष्ण विखे काँग्रेसमध्येच राहणार
दरम्यान, मोदींच्या सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा होती. या चर्चेला डॉ. सुजय विखे-पाटील यांनी पूर्णविराम दिला. राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्येच राहणार आहेत. ते भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत, असा खुलासा त्यांनी सभेत केला. ते काँग्रेसवर नाराज नाहीत. त्यांचे मतभेद राष्ट्रवादीशी आहेत, असे सुजय यांनी स्पष्ट केले.
दिलीप गांधींचे भाषण थांबवले
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सभेसाठी व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी खा. दिलीप गांधींचे भाषण सुरू होते. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी गांधींना रोखले. त्यावर गांधी चिडले. मी अजून बोलणार आहे. मला दोन मिनिटे बोलू द्या, अशा शब्दांत त्यांनी बेरड यांना सुनावले. मी विकास केला नाही, असे म्हटले जाते; पण मी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सोबत घेऊन आलो आहे, असे म्हणत त्यांनी भाषण पूर्ण केले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. दरम्यान, हा प्रकार समजताच मुख्यमंत्र्यांनी खा. गांधी यांना समजावले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: