Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजप नेत्यांना सत्तेची मस्ती : शरद पवार
ऐक्य समूह
Saturday, April 13, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: mn2
भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक दहशतवादी हल्ले
5सांगली, दि. 12 (प्रतिनिधी) : देशावर सर्वाधिक दहशतवादी हल्ले भाजप सरकारच्या काळात झाले. भाजप सरकारच्या हातात देश सुरक्षित नाही. त्यांच्याकडून देशाचे संरक्षण होणार नाही. शेतकर्‍यांना ‘साले’ म्हणणार्‍या आणि आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या पोरांना बेवारस म्हणणार्‍या भाजप नेत्यांना सत्तेची मस्ती आली आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.
सांगली लोकसभा मतदार-संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटना,   काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप व मित्र पक्षांचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी तासगाव येथे बाजार समिती आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खा. राजू शेट्टी, विशाल पाटील, आ. सुमनताई पाटील, आ. विश्‍वजित कदम, अरुण लाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पवार म्हणाले, अक्षरधाम मंदिर, संसद, अमरनाथ यात्रा, पठाणकोट, उरी, पुलवामा या ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले, त्यावेळी भाजपचे सरकार होते आणि मोदी म्हणतात, की ‘देश सुरक्षित हातो में है।’ मोदींकडून देशाचे संरक्षण होणार नाही. जिनिव्हा करारानुसार विंग कमांडर अभिनंदन सुटला; पण मोदी म्हणाले, 56 इंचाच्या छातीमुळे सुटला. मग, आमचा कुलभूषण जाधव का सुटला नाही? सध्या मोदींना आमच्या कुटुंबाची आणि राष्ट्रवादीची काळजी लागली आहे. त्यांना स्वतःचे कुटुंब नसल्यामुळे समजणार नाही; पण आमच्यावर आईचे संस्कार आहेत. आम्ही सर्व जण एक आहोत. मोदींनी दुसर्‍याच्या घरात वाकून बघायचे बंद करावे. मोदी मोठे मजेशीर भाषण करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत माझे नाव घेतल्याशिवाय त्यांचे भाषण पूर्ण होत नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे उत्तर पवारांनी द्यावे, असे मोदी म्हणतात. मी सत्तर हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मोदींनी पाच वर्षात काय केले?
‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ या मोदींच्या घोषणेची त्यांनी खिल्ली उडवली. 350 कोटी रुपयांचे राफेल विमान यांनी 1650 कोटी रुपयांना विकत घेतले. ज्या अनिल अंबानीला शाळेत कागदी विमान बनवण्यापलीकडे अनुभव नाही, त्याला कंत्राट दिले. मग, या व्यवहारातील कागदपत्रे गोपनीयतेच्या नावाखाली दाखवायला नकार दिला. मग, यातील पैसे कोणी खाल्ले, असा प्रश्‍न त्यांनी केला. सांगलीला राष्ट्रीय व राज्य पातळीवरील नेतृत्वाची मोठी परंपरा आहे. स्व. वसंतदादांनी शेतकर्‍यांना बळ दिले. राजू शेट्टींच्या चळवळीमुळे शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेता आले. या देशातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटल्याशिवाय देश टिकणार नाही. मोदींना शेतकर्‍यांचे प्रश्‍न कळत नाहीत. त्यामुळे हे सरकार बदला, असे आवाहन त्यांनी केले
खा. शेट्टी म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार असताना आंदोलन केले. मुख्यमंत्री चर्चा करायचे. पवारसाहेब पंतप्रधानांशी बोलायचे. विषय मार्गी लागायचे. मात्र, या सरकारला शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवायचे नाहीत. शेतकर्‍यांसाठी कोणालाही अंगावर घ्यायला आम्ही तयार आहोत.
आ. जयंत पाटील म्हणाले, शेतकरीविरोधी भूमिका घेणार्‍या नरेंद्र मोदी सरकारची साथ राजू शेट्टी यांनी सोडली. यापुढे शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्याचे आव्हान विशाल पाटील यांना पेलावे लागेल. नितीन गडकरी यांचा पराभव होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय मोदींचे भाषण पूर्ण होत नाही.
आ. विश्‍वजित कदम, उमेदवार विशाल पाटील, इलियास नायकवडी यांची भाषणे झाली. आ. सुमनताई पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सभेस सांगली जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, दिनकर पाटील, अविनाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील, प्रमोद पाटील, निवास पाटील, माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: