Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वडूजमध्ये बारा जणांवर खाजगी सावकारकीचा गुन्हा
ऐक्य समूह
Monday, April 15, 2019 AT 11:39 AM (IST)
Tags: re1
5वडूज, दि. 14 येथील कापड व्यावसायिकासह त्याच्या कुटुंबाकडे व्याजासह मुद्दलाची रक्कम मिळविण्यासाठी लावलेला तगादा व धमकीला कंटाळून वैभव पवार यांनी बारा जणांविरोधात वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यातील तिघांना वडूज पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, येथील शेतकरी चौकातील विशाल गारमेंट हे दुकान वैभव जगन्नाथ पवार चालवित आहेत. गेल्या 20 वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. 2016-17 पासून कापड व्यवसायात मंदी आल्याने हा व्यवसाय तोट्यात जाऊ लागला. व्यापार्‍यांचे पैसे देण्यासाठी 2016 पासून वैभव पवार यांनी व्याजाने पैसे घेण्यास सुरुवात केली. 2016 मध्ये अंकुश शिंगाडे व आशिष बनसोडे यांच्याकडून महिना 10 टक्के व्याजाने 5 लाख रुपये घेतले.   
त्यानंतर 2018 पर्यंत वेळोवेळी अडीच लाख रुपये दहा टक्क व्याजाने,  आकाश जाधव याच्याकडून 4 लाख 30 हजार रुपये आठवड्याला 38 हजार रुपये व्याज देण्याच्या बोलीवर घेण्याचे ठरले होते. या
शिवाय बकाशा जाधव याच्याकडून दीड लाख रुपये आठवडा 15 हजार रुपये व्याजाने, गणेश गोडसे याच्याकडून साडेतीन लाख रुपये दोन टप्प्यामध्ये महिना दहा टक्के व्याजाने, अंकुश तुपे याच्याकडून एक लाख रुपये महिना दहा टक्के व्याजाने, रामभाऊ काळे याच्याकडून 2018 मध्ये पाच लाख रुपये महिना बारा टक्के व्याजाने घेतले होते.
त्या व्यवहाराच्या बदल्यात सहा लाख रुपये व्याजासह परत दिले. सदरचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर नोव्हेंबर 2018 मध्ये 1 लाख 80 हजार रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. संग्राम उर्फ बबन गोडसे याच्याकडून एक लाख रुपये महिना 25 टक्के व्याजाने, विनोद पवार याच्याकडून दोन लाख रुपये साडे बारा टक्के व्याज दराने, सलमा डांगे हिच्याकडून 3 लाख 30 हजार रुपये महिना साडेसतरा टक्के व्याजाने, सचिन बाबूराव शिंदे याच्याकडून 30 हजार रुपये आठवडा दहा टक्के व्याजाने, अरुण कणसे याच्याकडून दोन लाख रुपये महिना दहा टक्के व्याजाने घेतले होते. व्याजाने घेतलेल्या पैशांपैकी वैभव पवार याने व्याजाचे पैसे देण्यासाठी काही रकमा व्याजाने उचललेल्या आहेत. तसेच व्याजाची व मुद्दलाची रक्कम देण्यासाठी कापड दुकानातील उत्पन्नातून परतफेड केली आहे.
मात्र सदरचे लोक हे आणखी मुद्दल व व्याज दमदाटी करून मागत असल्याची तक्रार वैभव पवार यांनी वडूज पोलीस ठाण्यात दिली आहे. त्याचप्रमाणे गणेश गोडसे, आकाश जाधव, बकाशा जाधव,
अंकुश तुपे (रा. वडूज), अरुण कणसे, सचिन शिंदे (रा. मुंबई) यांनी
फिर्यादीला मोबाईलवरून व्याजाने दिलेल्या पैशासाठी दमदाटी व
शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीच्या पत्नीस रस्त्यामध्ये भेटेल त्यावेळी शिवीगाळ करून व्याजाचे पैसे आणून दे, असे वारंवार म्हणत होते.
फिर्यादी व त्याची पत्नी फोन उचलत नसल्याने फिर्यादीच्या घरी जाऊन वयस्कर आई-वडील व भाऊ यांना सुद्धा दमदाटी, शिवीगाळ केली. यांच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी त्याची पत्नी व मुलांसह गुरुवार, दि. 11 रोजी सातारा येथे जाऊन राहिले. अंकुश शिंगाडे, आशिष बनसोडे, आकाश जाधव, बकाशा जाधव, गणेश गोडसे, अंकुश तुपे, रामभाऊ काळे, संग्राम उर्फ बबन गोडसे, विनोद पवार, सलमा डांगे, सचिन शिंदे, अरुण कणसे यांनी त्यांना कोणतीही परवानगी नसताना व्याजाने पैसे देऊन रकमेपोटी व्याज व मुद्दलसह रक्कम परत केली असतानाही फोन वरून, समक्ष व फिर्यादीच्या घरी येऊन कुटुंबाला वारंवार शिवीगाळ, दमदाटी केली. यावरून बारा जणांच्या विरोधात 323, 504, 506, 34, सावकार अधिनियम 2014 चे कलम 39, 45 या कलमान्वये वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील तिघांना अटक करून न्यायालयापुढे उभे केले असता गुरूवार, दि. 18 पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए. डी. हंचाटे
तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: