Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आयटी कंपनीने चोरला 7.8 कोटी लोकांचा आधार डेटा, गुन्हा दाखल
ऐक्य समूह
Monday, April 15, 2019 AT 11:34 AM (IST)
Tags: mn2
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : हैदराबादमधील सायबराबाद पोलिसांनी युआयडीएआयने दिलेल्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कंपनी आयटी ग्रिड्स (इंडिया) विरोधात तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 7.8 कोटींहून अधिक लोकांच्या आधार कार्डची माहिती बेकायदेशीरपणे आपल्याकडे ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही राज्यातील एकूण लोकसंख्या जवळपास 8.4 कोटी आहे. कंपनी आधार कार्डचा हा डेटा टीडीपी पक्षाचे सेवा मित्र अ‍ॅप डेव्हलप करण्यासाठी वापरत होती.
एफआयआरनुसार हा संपूर्ण डेटा एका रिमूव्हेबल स्टोरेज डिव्हाईसमध्ये ठेवण्यात आला होता. हे आधार अ‍ॅक्टचे उल्लंघन आहे. फॉरेन्सिक तंज्ञांनी संशय व्यक्त केला आहे, की हा डेटा सेंट्रल डेटा रिपॉजिटरी किंवा स्टेट डेटा हबद्वारे बेकायदेशीरपणे मिळवण्यात आला असावा. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण कथित डेटा चोरी प्रकरणांचा तपास करणार्‍या एसआयटीकडे सोपवले जाऊ शकते.           
आयटी ग्रिड्सच्या कार्यालयातून मिळालेल्या हार्ड डिस्कची तपासणी केली असता तेलंगणा स्टेट फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने सांगितले, की कंपनीजवळ तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील 78,221,397 रहिवाशांशी संबंधित आधार डेटा आहे. फॉरेन्सिक तपासणी केली असता डेटाबेसची बांधणी आणि आकार अगदी युआयडीएआयशी मिळती जुळती आहे.
दरम्यान, टीडीपीने स्पष्टीकरण देत आधार डेटाची कच्ची माहिती आपल्याकडे नसून कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींची माहिती मिळवण्यासाठी वापर केला जात होती असे सांगितले आहे. एसआयटी आणि युआयडीएआयने दिलेल्या माहितीच्या आधारे माधापूर पोलीस ठाण्यात आधार अ‍ॅक्टअंतर्गत वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: