Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चंद्रकांतदादा आपण कोणामुळे निवडून आला : खा. उदयनराजे
ऐक्य समूह
Monday, April 15, 2019 AT 11:37 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 14 : चंद्रकांतदादा आम्ही मनाने राजे आहोत. मी मनाने किती मोठा आहे, ते तुम्हाला ठाऊक आहे. पदवीधर निवडणुकीत आम्ही किती मदत केली होती. ते तुम्ही आठवा म्हणजे कोणामुळे निवडून आला ते कळेल. आता मला यावर अधिक काही बोलायचे नाही. असा सूचक इशारा खा. उदयनराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, मिशा पिळत माथाडींकडून मिळवायचे नंतर गिळायचे असा टोला उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांना लगावला. गाठायचंच ठरवलं तर कुठंही गाठू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी विकास कामाचा निर्धारनामा प्रसिद्ध केला त्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, नगरसेवक डी. जी. बनकर, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, शिरीष चिटणीस, अशोक सावंत याची उपस्थिती होती.       
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, पुढील पाच वर्षातील कामाचे नियोजन आम्ही केले आहे. नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. अनेक मोठी विकास कामे मार्गी लावली. यापुढे कमी पडणार नाही. तसेच शेती, पाणी, आरोग्य, इंडस्ट्रीयल, शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाच वर्षांत काम केले जाणार आहे. देशातील 80 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठी पाच वर्षांत प्रयत्न झाले नाहीत. कर्जाच्या ओझ्याखाली आज शेतकरी जगत आहेत. शेतकर्‍यांना आज कोण विचारात नाही. शेतकर्‍यांना सबसिडी दिली जाते. त्या सरकारी योजनांसाठी हेलपाटे मारून मरतोय. पण त्याचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहचत नाही, अशी आज अवस्था होऊन बसली आहे. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही. तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही. शेतकरी सदन होईल त्यावेळी शेती व्यवसाय सुधारणा होईल. सिंचन योजना यापूर्वीच पूर्ण व्हायला हव्या होत्या. पण ज्या त्या वेळी प्रश्‍न सोडवले गेले नाहीत.
उच्च शिक्षण व कौशल्य विकासासाठी पाच वर्षांत प्रयत्न केले जाणार आहेत. करिअर डेव्हलपमेंट कोर्स सेंटरची उभारणी केली जाणार आहे. सातारचे रेल्वे स्टेशनची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. लोकांना रोजगार घरे मिळाली पाहिजेत. लोकांना मूलभूत सुविधा आजही मिळत नाहीत. आमचा पुढील पाच वर्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्या प्रमाणे कामे केली जाणार आहेत. तसेच कृष्णा नदी शुद्धीकरण मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी संकल्पना ठीक आहे. स्मार्ट सिटी कागदोपत्री राबवली जात आहे. अशी टीकाही खा. उदयनराजे यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: