Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाराणसीत नरेंद्र मोदीं विरोधात काँग्रेसकडून प्रियांका गांधींना उमेदवारी?
ऐक्य समूह
Monday, April 15, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस प्रियांका गांधींना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शनिवारी काँग्रेसने उमदेवारांची यादी जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून आपला उमेदवार घोषित न करता गूढ कायम ठेवले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
प्रियांका गांधी यांना उमेदवारी देण्यासंबंधी काँग्रेसने कमालीची गुप्तता पाळली आहे. कोणीही भाष्य करण्यास तयार नाही. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही प्रियांका गांधी लोकसभेत प्रवेश करणार का यासंबंधी भाष्य करणे टाळले आहे. ‘वाराणसीच्या जागेसंबंधी जो काही निर्णय होईल तो अंतिम झाल्यानंतर कळवण्यात येईल’, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलाहाबाद आणि वाराणसी या दोन्ही मतदारसंघांमध्ये पक्षाची नेमकी काय परिस्थिती आहे        
हे तपासण्यासाठी सर्व्हे केला जात आहे. पक्षाने दोन्ही जागांवर आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शनिवारी काँग्रेसने वाराणसी मतदारसंघातून 2004 रोजी विजयी झालेले राजेश मिश्रा यांना शेजारच्या सालेमपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. प्रियांका गांधी यांनी याच वर्षी राजकारणात प्रवेश केला आहे. त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. उत्तर प्रदेशातील पूर्व भागातील सर्व जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्षातील सुत्रांनुसार 2014 रोजी प्रियांका गांधी नरेंद्र मोदीं विरोधात निवडणूक लढण्यास उत्सुक होत्या.
एकीकडे नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक जिंकण्यास उत्सुक असताना प्रियांका गांधी त्यांना चांगली लढत देऊ शकतात. दरम्यान, काँग्रेस पक्षात प्रियांका गांधींना निवडणूक लढण्यावरुन दोन मत प्रवाह आहेत. काही जण प्रियांका गांधी पहिल्यांदाच निवडणूक लढवणार असल्याने त्यांचा पराभव होण्याची शक्यता जास्त आहे. हे त्यांना महागात पडू शकते. तर काही जण प्रियांका गांधींमुळे नरेंद्र मोदी मागे पडतील सोबतच भाजपच्या प्रचार मोहिमेला मोठा धक्का बसेल,असे सांगत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: