Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाबळेश्‍वरमध्ये गारांसह तासभर मुसळधार पाऊस
ऐक्य समूह
Tuesday, April 16, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: re3
5महाबळेश्‍वर, दि. 15 :  गेले तीन दिवस केवळ हलक्या सारी व किरकोळ गारा अशी हुलकावणी देवून महाबळेश्‍वर शहरवासीयांना दुपारच्या वेळी उकाड्याने हैराण करणार्‍या पावसाने आज तासभर तुफान गारांची बरसात करून वातावरण शांत केले.
गेली तीन दिवस येथे उकाड्यानेे दुपारच्या वेळी नागरिक वैतागले होते. या पर्यटनस्थळाची सकाळ व रात्र चांगली असायची मात्र दुपार झाली, की उन्हाने काही तास नागरिकांची तगमग व्हायची. दोन दिवसांपूर्वी असेच आकाश काळ्या ढगांनी भरून आले व पावसास सुरुवातही झाली. थोड्या गाराही शहर परिसरात पडल्या. मात्र, त्यानंतर वारे सुटल्याने पावसाच्या हलक्या सरी शहरात कोसळल्या. त्यानंतर पाऊस एकदम गायब झाला होता. तशीच काहीशी अवस्था दुसर्‍या दिवशीही झाली. मात्र दुसर्‍या दिवशी शहरातून वार्‍याबरोबर सभोवताली प्रचंड पाऊस व गारांनी झोडपून काढले. मात्र, महाबळेश्‍वर शहर तापतच राहिले.   
अखेर आज दुपारी चारच्या सुमारास ढगांनी आकाशात गर्दी करत बरसण्यास सुरुवात केली. त्याबरोबर गाराही पडू लागल्या. प्रचंड गारांची वृष्टी होवू लागली. गारांचा आकार व गारांचा वेग आणि पावसाचा वेगही वाढतच गेला. सुपारी एवढ्या गारांची सुमारे तासभर बरसात झाली. त्याचा आनंद पर्यटकांबरोबरच स्थानिकांनी लुटला. बाळगोपाळांबरोबरच पर्यटक व स्थानिकांना गारा गोळा करण्याचा मोह आवरता आला नाही. सुमारे तासभर पावसामुळे शहराला झोडपल्यामुळे वातावरणात गारवा आला असून शहरात समाधानाचे वातावरण आहे.
गंगोती येथे वीज पडून म्हैस ठार
गंगोती, ता. माण येथील शेतकरी ईश्‍वरा राणाप्पा झिमल यांची घरासमोर दावणीला बांधलेली साठ हजार रूपये किमतीची म्हैस अंगावर वीज कोसळून ठार झाली.
माण तालुक्यात रविवारपासून वादळीवार्‍यासह ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू आहे. गंगोती येथील शेतकरी दुष्काळी परिस्थितीतही पोटाला चिमटे काढून पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. ते दुष्काळातही पाच जनावरे पोटच्या पोरासारखी सांभाळत होते. पावसाळी वातावरणामुळे काल जनावरे रानातून फिरवून आणून दावणीला बांधली होती. सायंकाळी 7.30 च्या सुमारास गंगोती परिसरात वीजेचा कडकडाट सुरू होता. अचानक झिमल यांच्या घरासमोर बांधलेल्या पाच जनावरांपैकी म्हशीच्या अंगावर वीज कोसळल्याने ती जाग्यावरच ठार झाली. या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी सुरेश बदडे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तारळेकर, पोलीस पाटील वैशाली राहुल झिमल यांनी केला आहे. संबंधित शेतकर्‍यास नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: