Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मतदान संपताच पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ;
ऐक्य समूह
Tuesday, May 21, 2019 AT 11:35 AM (IST)
Tags: na3
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?
5नवी दिल्ली, दि. 20 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील सातव्या टप्प्यातले मतदान संपताच पेट्रोल, डिझेलचे दर भडकण्याची शक्यता आहे. मुंबईत सोमवारी पेट्रोलच्या दरात 9 पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेलचा दर लीटरमागे 16 पैशांनी वधारला आहे. देशाच्या राजधानीतही इंधन दर वाढले आहेत. गेले दोन महिने इंधनाच्या दरात फारशी वाढ झाली नव्हती. गेल्या 15 दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर घसरत होते. मात्र काल शेवटच्या टप्प्यातले मतदान संपताच आज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली.
पेट्रोल, डिझेल दरात झालेली वाढ नियमित स्वरूपाची असून त्यात काहीच चुकीचे नसल्याचे सरकारी इंधन  कंपन्यांनी सांगितले. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या काळात सरकारने कंपन्यांना इंधन दर स्थिर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. गेल्या काही दिवसात इंधन कंपन्यांनी फारशी वाढ केलेली नव्हती. या काळात झालेले नुकसान आता भरून काढण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात इंधनाचे दर भडकतील, अशी दाट शक्यता आहे. याचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
जागतिक इंधन बाजारातील स्थिती सध्या फारशी चांगली नाही. अरब राष्ट्रांमधील तणाव, इराण, व्हेनेझुएलामधून कमी झालेला तेल पुरवठा यामुळे इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात देशात पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका उडू शकतो. सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मार्च-एप्रिल महिन्यात इंधन कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रती लीटरमागे 5 रुपये तर डिझेल दरात प्रती लीटरमागे 3 रुपयांची सवलत दिली होती. या सवलतीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी इंधन कंपन्यांकडून दरवाढ केली जाण्याची दाट शक्यता आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचा दर प्रती बॅरलमागे 70 डॉलरहून अधिक आहे. गेल्या ऑगस्टमध्ये खनिज तेलाचा दर इतका असताना भारतात पेट्रोलचा दर 78 रुपयांच्या तर डिझेलचा दर 70 रुपयांच्या आसपास होते. मात्र सध्याच्या घडीला भारतात पेट्रोल 73, तर डिझेल 67 रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे इंधन कंपन्यांना नुकसान सोसावे लागत आहे. मतदानाचे सातही टप्पे पूर्ण झाल्याने आता लवकरच इंधन दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: