Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राहुल गांधी अजूनही राजीनाम्यावर ठाम
ऐक्य समूह
Tuesday, May 28, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: na3
कर्नाटक, राजस्थानमधील सरकारांचे भवितव्य अधांतरी
5नवी दिल्ली, दि. 27 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित आणि मानहानिकारक पराभवामुळे काँग्रेसमध्ये सन्नाटा पसरला असून नेते व कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या परवा झालेल्या बैठकीत पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी अजूनही त्यावर ठाम आहेत. त्यामुळे पक्षात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच कर्नाटक आणि राजस्थानमध्ये काँग्रेसच्या सरकारांचे भवितव्य अधांतरी झाले आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला 2014 पेक्षा थोड्या जागा अधिक मिळाल्या असल्या तरी त्यांना   यावेळीही लोकसभेत अधिकृत विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता नाही. लोकसभा निवडणुकीत ‘मोदी त्सुनामी’त पुन्हा
एकदा काँग्रेसचा धुव्वा उडाला. गेल्या वेळी 44 जागा जिंकणार्‍या काँग्रेसला यावेळी 52 जागांपर्यंतच मजल मारता आली. 18 राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पक्षाला खातेही उघडता आले नाही. या दारुण पराभवाचे तीव्र पडसाद काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पाहायला मिळाले.
या बैठकीत राहुल गांधी यांनी पक्षाध्यपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे काँग्रेसचे नेते आणखीच बिथरले. त्यांनी एकमुखाने राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव नाकारला. पक्षाच्या दारुण पराभवानंतर राजीनाम्याचे सत्र सुरू झाले आहे. आतापर्यंत 13 पदाधिकार्‍यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. त्यात उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पंजाबचे प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड, झारखंडचे अजयकुमार, आसामचे प्रदेशाध्यक्ष निपुन बोरा आदी प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. त्यात आणखी काही नेत्यांची भर पडण्याची शक्यता असल्याने येणारा काळ काँग्रेससाठी कसोटीचा ठरणार आहे.
दरम्यान, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील नेत्यांच्या पुत्रप्रेमावर राहुल गांधी यांनी निशाणा साधला. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थानचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदम्बरम यांची थेट नावे घेऊन
त्यांच्यामुळे पक्षाला अपयश आल्याचा ठपका ठेवला. त्या शिवाय तडकाफडकी आपला पक्षाध्यक्षपदाचा राजीनामाही सादर केला. पक्षाला नवे नेतृत्व शोधावे लागेल. त्यासाठी हीच योग्य वेळ आहे. पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरचा असावा, असे ते म्हणाले होते. त्यांचा प्रस्ताव सोनिया गांधींसह सर्व नेत्यांनी फेटाळला असला तरी राहुल गांधी अजूनही राजीनाम्यावर ठाम असल्याने पक्षात पेच निर्माण झाला आहे.
कर्नाटक, राजस्थानात अस्वस्थता
काँग्रेसमध्ये गोंधळ सुरू असतानाच कर्नाटकात भाजप नेतृत्व पडद्यामागून सक्रिय झाले आहे. काँग्रेसचे आमदार रमेश
जरकिहोळी आणि डॉ. सुधाकर यांनी रविवारी भाजपचे नेते एस. एम. कृष्णा यांची भेट घेतली. तेथे भाजपचे राज्यातील अन्य काही नेते उपस्थित होते.
या नेत्यांची काँग्रेस आमदारांबरोबर प्रदीर्घ चर्चा झाल्याने काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची भीती आहे. त्यामुळे तेथील काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दलाचे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजस्थान काँग्रेसमधील अनेक आमदारही पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. लोकसभेतील दारुण पराभवाची जबाबदारी निश्‍चित व्हायला हवी, अशी मागणी अनेक मंत्री व आमदारांनी उघडपणे केली आहे. त्यामुळे राजस्थान सरकारचेही भवितव्य अधांतरी आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: