Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अजित दोवाल यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा
ऐक्य समूह
Tuesday, June 04, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: na3
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी पाच वर्षे मुदतवाढ
5नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत विश्‍वासू सहकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकालात त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 साली प्रथम सत्तेत आल्यावर दोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती केली होती. त्यावेळी त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा होता. मात्र, राष्ट्राच्या सुरक्षेत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल दोवाल यांचा राज्यमंत्रिपदाचा दर्जा वाढवून आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी येथे लष्कराच्या तळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकच्या बालाकोटमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यांची रणनीती आखण्यात दोवाल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीसोबत डोकलाम येथे झालेल्या  संघर्षानंतर चीनबरोबरच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी तत्कालीन परराष्ट्र सचिव व विद्यमान परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या साथीत दोवाल यांनीच मुत्सद्देगिरी दाखवून तो तणाव कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. उत्तराखंडमधील पौडी गढवालमध्ये दोवाल यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण अजमेर सैनिक स्कूलमध्ये झाले. त्यानंतर आग्य्रामध्ये त्यांनी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. दोवाल हे 1968 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी तब्बल 33 वर्षे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सेवा केली होती. ‘आयबी’चे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले होते. त्यांनी पाकिस्तानमध्ये तब्बल सहा वर्षे वास्तव्य करून भारतासाठी हेरगिरी केली होती. दोवाल यांना 1988 मध्ये सैनिकांसाठी असलेला ‘कीर्तिचक्र’ पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले पोलीस अधिकारी आहेत.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: