Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काँग्रेस गर्तेत; पंजाबमध्ये मुख्यमंत्री-सिद्धू वाद
ऐक्य समूह
Friday, June 07, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाने खचलेल्या काँग्रेसचा पाय आणखी खोलात जात आहे. निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत विविध राज्यांमधील पक्ष पदाधिकार्‍यांचे राजीनाम्याचे सत्र संपते न् संपते तोच आता पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे तेलंगणात काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीत प्रवेश करताना तेलंगणा काँग्रेस टीआरएसमध्ये विलीन करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत विधानसभा अध्यक्षांनी या 12 आमदारांच्या टीआरएसमधील विलीनीकरणाला गुरुवारी मान्यता दिली.
तेलंगणात काँग्रेसला मोठा धक्का बसला. पक्षाच्या 18 पैकी 12 आमदारांनी सत्तारूढ तेलंगणा राष्ट्र समितीत प्रवेश केला. या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून पक्ष बदलत असल्याची माहिती दिली. राज्यातील काँगे्रस पक्षच टीआरएसमध्ये विलीन करण्याची मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. ती मागणी अध्यक्षांनी मान्य करत या 12 आमदारांचा टीआरएसमधील प्रवेश वैध ठरवला. मात्र, पक्षांतरबंदी कायद्यानुसार या आमदारांचे सदस्यत्व रद्द होणार नाही. कारण दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षबदल केल्यास पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही. तेलंगणा विधानसभा निवडणुकीत टीआरएसला 119 पैकी 88 जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये घरघर सुरू झाली होती. अनेक आमदार राज्याच्या नेतृत्वावर नाराज होते. अपेक्षेनुसार हे आमदार टीआरएसमध्ये सामील झाले. या घडामोडींनंतर काँग्रेसने टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांच्यावर प्रखर टीका केली. केसीआर यांनी घोडेबाजार करून आमच्या आमदारांना विकत घेतले. त्यासाठी त्यांनी भ्रष्टाचारी मार्गाने कमावलेल्या पैशाचा वापर केला, असा आरोप काँगे्रसने केला आहे.
दुसरीकडे पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीत शहरी भागात काँगे्रसची कामगिरी सुमार झाल्याने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांना त्यासाठी जबाबदार धरले. त्यामुळे या दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. 
 लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीला सिद्धू यांनी दांडी मारली. काँग्रेसच्या अपयशासाठी मला अयोग्य पद्धतीने जबाबदार धरले जात आहे, काही लोकांची मला पक्षाबाहेर काढण्याची इच्छा आहे.  असे आरोप सिद्धू यांनी केले. या आरोपानंतर सिद्धू यांच्याकडील खाती बदलण्यात आली आहेत.
सिद्धू यांच्याकडे वीज आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. सिद्धू यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या खात्यांचाही खांदेपालट करण्यात आला आहे. या आधी सिद्धू यांच्याकडे शहर विकास मंत्रालयाची जबाबदारी होती. या व्यतिरिक्त ते पर्यटन आणि सांस्कृतिक खात्याचा कार्यभारही सांभाळत होते. आता ही खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: