Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपत फेरबदलाची शक्यता
ऐक्य समूह
Monday, June 10, 2019 AT 11:49 AM (IST)
Tags: na1
अमित शहांनी 13 व 14 रोजी बोलावली बैठक
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) :  भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशभरातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची दि. 13 आणि 14 जून रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जात आहे. शहा गृहमंत्री झाल्यानंतर एक व्यक्ती एक पद या तत्त्वानुसार भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला द्यायची हा मोठा प्रश्‍न भाजपपुढे आहे. या बैठकीत या प्रश्‍नावर विचारविनिमय होणार आहे.
भाजपच्या बैठकीबाबत पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत देशभरातील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बोलावण्यात आले आहे. सर्वच राज्यातील प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम बैठकीत ठरवला जाण्याची शक्यता आहे. तथापि, हरयाणा, महाराष्ट्र आणि झारखंड या सारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत असल्याने या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका टाळल्या जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत राज्यांमधील निवडणुकानंतरच भाजप राज्यातील नेतृत्व बदल करत आला आहे.
अमित शहा यांचा तीन वर्षांचा कार्यकाल या वर्षाच्या सुरुवातीलाच संपुष्टात आला आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीमुळे त्यांचा अध्यक्षपदाचा कालावधी वाढवण्यात आला. अमित शहा गृहमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ते पक्षाध्यक्षपद सोडतील, असे ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडून याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आली नाही.
या बरोबरच पक्षाने राष्ट्रीय स्तरावर सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवा अध्यक्ष निवडण्यापूर्वी सदस्य नोंदणी मोहीम  पूर्ण करण्यात येईल. इतकेच नाही तर बूथ स्तरापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत संपूर्ण संघटनेची पुनर्बांधणी केली जाणार आहे. राज्य कार्यकारिणीच्या सदस्यांनी आपला अध्यक्ष निवडल्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष निवडतील.
नड्डा यांचे नाव शर्यतीत सर्वात पुढे
अमित शहा यांना पर्याय म्हणून पक्षाध्यक्षपदासाठी माजी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांचे नाव सर्वात पुढे आहे. मात्र, अमित शहा हेच पक्षाध्यक्षपदी कायम राहतील, अशीही पक्षात चर्चा आहे. त्यांच्या मदतीसाठी कार्याध्यक्ष निवडला जाईल, असेही म्हटले जात आहे. गृहमंत्रालयाचा कारभार सांभाळताना अमित शहा यांना पक्षासाठी तितकासा वेळ देता येणार नाही. याच कारणासाठी नवा अध्यक्ष निवडण्याची आवश्यकता असल्याचाही एक मतप्रवाह पक्षात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: