Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बेपत्ता ‘एएन-32’ विमानाचे अवशेष दिसले
ऐक्य समूह
Wednesday, June 12, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या ‘एएन-32’ या प्रवासी विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशमध्ये मंगळवारी  दिसल्याची माहिती भारतीय हवाई दलाकडून देण्यात आली. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यातील दाट झाडीत हे अवशेष दिसल्यामुळे शोधमोहिमेला वेग आला आहे. विमान बेपत्ता झाल्यानंतर आठ दिवसांनी त्याचे अवशेष दिसून आले आहेत.
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील रशियन बनावटीच्या ‘एएन-32’ या प्रवासी विमानाने आसाममधील जोरहाट येथून 3 जून रोजी दुपारी 12.27 वाजता 13 जणांसह उड्डाण केले होते. हे विमान अरुणाचल प्रदेशातील मेचुका येथे पोहोचणे अपेक्षित होते. या विमानाशी दुपारी 1 वाजता अखेरचा संपर्क झाला होता. त्यानंतर नियंत्रण कक्षाचा या विमानाशी असलेला संपर्क तुटला होता. या विमानातून विंग कमांडर जीए. एम. चार्ल्स, स्न्वाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाइट लेफ्टनंट मोहित गर्ग, सुमित मोहंती, आशिष मिश्रा व राजेश थापा यांच्यासमवेत अनुप, शरीन, के. के. मिश्रा, राजेशकुमार आणि पुतली हे हवाई दलाचे जवान प्रवास करत होते. या विमानात अत्याधुनिक रडार यंत्रणा नसल्याने त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता.  
विमान बेपत्ता झाल्यानंतर हवाई दलाने हेलिकॉप्टर, मानवरहीत हवाई वाहन, सी-130 जे’ विमानातून शोधमोहीम सुरू केली होती. मात्र, खराब हवामान, परिसरातील दाट जंगल यामुळे विमानाचे अवशेष सापडत नव्हते. अखेर हवाई दलाच्या ‘एमआय-17’ या हेलिकॉप्टरमधील वैमानिक व इतर सदस्यांना विमानाच्या अवशेषासारखे काही भाग दिसले होते. हवाई दलाने अरुणाचल प्रदेशच्या पोलिसांना ही माहिती कळवली होती. याबाबत हवाई दलाने ट्विट करून माहिती दिली. बेपत्ता ‘एएन-32’ विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो येथून 16 किलोमीटर दूर दिसले आहेत. ‘एमआय-17’ हेलिकॉप्टरमधून सुमारे 12 हजार फूट उंचावरून टाटोच्या उत्तर-पूर्व भागात हे अवशेष दिसले, असे ट्विट हवाई दलाने केले. अवशेष दिसल्यानंतर आता हवाई दलाचे पथक या विमानातील प्रवाशांच्या स्थितीबाबतची माहिती घेईल.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: