Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘वायू’ चक्रीवादळ गुजरातमध्ये आज धडकणार राज्यात मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता
ऐक्य समूह
Wednesday, June 12, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीवर दक्षिण-पूर्व भागातील अरबी समुद्र, लक्षद्वीप, कर्नाटक, गुजरात आणि केरळच्या समुद्रात तयार झालेले ‘वायू’ चक्रीवादळ उद्या (बुधवार) अधिक जोर पकडणार असल्याने पश्‍चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन काही दिवस लांबणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ उद्या गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केंद्रीय मंत्र्यांसह हवामान विभागाशी निगडीत संस्थांच्या अधिकार्‍यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन आपत्कालीन उपाययोजनांचा आढावा घेतला.
दरम्यान, समुद्र खवळणार असल्याने मच्छिमारांनी 11 आणि 12 जून रोजी समुद्रात जाणे टाळावे. 12 आणि 13 जून हे दोन दिवस अरबी समुद्रात उत्तर-पूर्व भागात आणि गुजरातच्या किनार्‍यावरही ‘वायू’ चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता असून खोल समुद्रात गेलेल्यांनी तत्काळ माघारी यावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. उद्या (12 जून) रोजी वार्‍याच्या वेगात वाढ होणार असून ताशी 120 ते 135 किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर वार्‍याचा वेग ताशी 135 किमीपर्यंत असेल तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वार्‍याचा वेग ताशी 70 किमीपर्यंत असेल. 13 जून रोजी वादळाचा वेग काहीसा कमी होईल. उत्तर अरबी समुद्रात व गुजरातच्या किनारपट्टीवर सुमारे ताशी 125 किमी वेगाने वारे वाहणार असून हळूहळू चक्रीवादळाचा वेग मंदावणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: