Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘चांद्रयान-2’ 15 जुलैला अवकाशात झेपावणार
ऐक्य समूह
Thursday, June 13, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na1
‘इस्रो’कडून महत्त्वाकांक्षी मोहिमेची तारीख जाहीर
5बंगलोर, दि. 12 (वृत्तसंस्था) : भारताच्या महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित ‘चांद्रयान-2’ मोहिमेची तारीख भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आज जाहीर केली. येत्या 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी ‘चांद्रयान-2’ अवकाशात झेपावणार असून अवघ्या दहा वर्षांत ‘इस्रो’ दुसर्‍यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे. ‘चांद्रयान-2’चे प्रक्षेपण 9 जुलै ते 15 जुलै या दरम्यान होणार असल्याचे ‘इस्रो’ने मागील महिन्यातच स्पष्ट केले होते.
‘इस्रो’चे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी पत्रकारांना या मोहिमेची माहिती दिली. या मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक वेबसाइटही आज सुरू करण्यात आली. ‘चांद्रयान-1’च्या धर्तीवरच ही दुसरी मोहीम असेल. मात्र, चंद्रावर ‘रोव्हर’ उतरवण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. या संपूर्ण मोहिमेवर प्रक्षेपणासह 978 कोटी रुपये खर्च होतील, असे सिवन यांनी सांगितले. ‘चांद्रयान-2’ आणि ‘जीएसएलव्ही एमके3’ या प्रक्षेपकाच्या निर्मितीत 620 उद्योग आणि 15 शैक्षणिक संस्थांनी भूमिका बजावली आहे.
‘चांद्रयान-2’चे ‘लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर’, असे तीन भाग असतील. यानाचे एकूण वजन 3800 किलो आहे. यापैकी रोव्हर हे रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन 27 किलो व लांबी 1 मीटर आहे. 
लँडरचे वजन 1400 किलो आणि लांबी 3.5 मीटर आहे. ऑर्बिटरचे वजन 2400 किलो आणि लांबी 2.5 मीटर आहे.
‘चांद्रयान-2‘चे ‘जीएसएलव्ही एमके3’ या प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपण झाल्यानंतर लँडर, ऑर्बिटर आणि रोव्हर या एकत्रित रचनेला अवकाशात एकामागून एक अशा पाच कक्षा ओलांडाव्या लागतील. त्यासाठी 16 दिवसांचा कालावधी लागेल. या कक्षा ओलांडताना ‘चांद्रयान-2‘  एकूण साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास करून चंद्राच्या कक्षेत जाईल. तेथून ते चंद्रावर पोहोचायला तीन ते चार दिवस जातील. ‘चांद्रयान-2‘ अपेक्षित कक्षेत पोहोचले, की लँडर ऑर्बिटरपासून वेगळे होईल. त्यानंतर लँडर चंद्रापासून 100 कि.मी. ते 30 कि.मी. अंतरावरील कक्षेत चार दिवस फिरत राहील. त्यानंतर लँडर चंद्रापासून 30 कि.मी.च्या कक्षेत पोहोचेल. त्यावेळी लँडरची चंद्रावर उतरवण्याची क्रिया सुरू होईल. प्रत्यक्ष चंद्रावर उतरण्याच्या दिवशी लँडरची प्रपल्शन सिस्टीम त्याचा वेग कमी करेल आणि लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात येईल. ही प्रक्रिया सर्वांत आव्हानात्मक असून त्यासाठी सुमारे 15 मिनिटांचा वेळ लागेल. लँडर चंद्रावर उतरल्यानंतर त्याची दारे उघडून रोव्हर चार तासांनी बाहेर येईल. ही प्रक्रिया खूप हळूवार असेल. रोव्हर प्रतिसेकंद एक सेंटीमीटर या वेगाने चंद्रावर 500 मीटर अंतरापर्यंत फिरेल. 6 किंवा 7 सप्टेंबर रोजी लँडर चंद्रावर उतरेल. तो चांद्रदिवसाचा प्रारंभ
असल्याने आम्ही या दिवसाची निवड केली आहे. लँडर आणि रोव्हरचे आयुष्मान एका चांद्रदिवसाचे (पृथ्वीवरील 14 दिवस) असेल तर ऑर्बिटरचे जीवनमान एक वर्षाचे असेल, अशी माहिती सिवन यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: