Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तीन तलाक विरोधी नव्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
ऐक्य समूह
Thursday, June 13, 2019 AT 11:23 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : सतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 17 जूनपासून सुरू होत असून मोदी सरकार आपल्या नव्या पर्वातील पहिल्याच अधिवेशनात तीन तलाक विरोधी विधेयक संसदेत मांडणार आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तीन तलाक विरोधी नव्या विधेयकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.
तीन तलाकबाबत चौथा अध्यादेश मोदी सरकारने आधीच्या कार्यकाळात काढला होता. त्याला विधेयकाचे स्वरूप देण्यात येणार आहे. यामध्ये विरोधी पक्षांनी केलेल्या काही दुरुस्त्यांचाही अंतर्भाव करण्यात येणार आहे. त्यास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
गेल्या सरकारच्या कार्यकाळात अखेरच्या दिवशी राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले होते. त्यावेळी सरकारने घाईघाईत, सर्वांच्या सहमतीशिवाय हे विधेयक सभागृहात आणले आहे, असे नमूद करत विरोधकांनी विधेयक रोखले होते. याबाबत बोलताना हे विधेयक आता संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत होईल. राज्यसभेतही या विधेयकाला कोणती आडकाठी येईल, असे वाटत नसल्याचे जावडेकर म्हणाले. 
या विधेयकात विरोधकांच्या मागणीनुसार बदल केले आहेत. पत्नी वा तिच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीने केलेली तक्रारच ग्राह्य धरली जाईल, पती आणि पत्नीची सहमती असल्यास न्यायदंडाधिकारी समेट घडवून आणू शकतील, तीन तलाक हा अजामीनपात्र गुन्हा नसेल, पत्नीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायदंडाधिकारी जामिनावर निर्णय देऊ शकतील, या विरोधकांच्या दुरुस्त्या नव्या विधेयकात समाविष्ट करण्यात आल्या आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटीचा कालावधी सहा महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. त्यामुळे 3 जुलै 2019 पासून पुढील सहा महिने तेथे राष्ट्रपती राजवट
राहणार आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: