Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मांडुळाची तस्करी करणारे युवक जेरबंद
ऐक्य समूह
Friday, June 14, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo4
मांडूळ, मोबाईल, कारसह 56 लाखाचा मुद्देमाल ताब्यात
5सातारा, दि. 13 : शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीत दुर्मीळ मांडूळ जातीच्या सर्पाची तस्करी करण्यासाठी आलेल्या तीन युवकांना सातारा तालुका पोलिसांनी जेरबंद केले. या युवकांकडून मांडूळ सर्प, मोबाईल व इनोव्हा कार असा एकूण 56 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून कारवाईनंतर या युवकांना पुढील कारवाईसाठी सातारा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, अंधश्रद्धेपोटी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मांडूळ सर्पाची किंमत 50 लाख ते एक करोडपर्यंत असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उत्तम कोळी व सुजित भोसले यांना खास बातमीदारामार्फत काही युवक शेंद्रे, ता. सातारा गावच्या हद्दीतील चिंध्यापीर या ठिकाणी दुर्मीळ मांडूळ सर्प विक्रीसाठी येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर मग सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डिटेक्शन ब्रँच पथकातील पोलीस नाईक सुजित भोसले, उत्तम कोळी, कॉन्स्टेबल संदीप कुंभार, रमेश चव्हाण व वनपाल श्रीकांत वसावे यांनी त्या ठिकाणी सापळा रचला.
यावेळी एका इनोव्हा कारमधून संशयित तीन इसम तिथे आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करत असताना  त्यातील एका युवकाकडे काऴ्या रंगाच्या बॅगेत एक काऴ्या रंगाचा मांडूळ जातीचा सर्प मिळून आला. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरचे मांडूळ विक्रीसाठी आणले असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अभिजित चंद्रकांत महाडिक (वय 20) व अमोल अधिकराव महाडिक (वय 24), दोघेही रा. निनाम, ता. सातारा व एका अल्पवयीन युवकास ताब्यात घेतले. या कारवाईत त्यांच्याकडून मांडूळ सर्प, मोबाईल व इनोव्हा कार असा एकूण 56 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. कायदेशीर कारवाईनंतर या युवकांना पुढील कारवाईसाठी सातारा वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, अंधश्रद्धेपोटी मांडूळ, कासव, वाघनखे, सांबराची शिंगे, नागमणी व अन्य वन्यप्राण्यांची तस्करी किंवा पैशाचा पाऊस पाडणे अशा प्रकारे कोणी फसवणूक करत असल्यास नागरिकांनी संबंधित पोलीस ठाणे व वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या कारवाईत वरील शिलेदारांसह सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम, वनविभागाचे अधिकारी शीतल राठोड, वनरक्षक शंकर आवळे, वनपाल श्रीकांत वसावे, सुहास भोसले, प्रशांत पडवळ यांनी कारवाईत सहभाग घेतला होता. या सर्वांचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी अभिनंदन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: