Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विद्यमान खासदार व आमदार कलेढोण परिसराला न्याय देणार का?
ऐक्य समूह
Friday, June 14, 2019 AT 11:16 AM (IST)
Tags: re3
5मायणी, दि. 13 : नीरा-देवघर योजनेचे माढा मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या हक्काचे पाणी पुन्हा एकदा माढ्याकडे वळवून आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीचा धडाकेबाज शुभारंभ करणारे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि पक्ष बाजूला ठेऊन मित्रप्रेम जपणारे खटाव-माणचे आ. जयकुमार गोरे हे आता खटाव तालुक्यातील कलेढोण परिसरातील गावांना टेंभू योजनेचे पाणी मिळावे, या मागणीला न्याय मिळवून देणार का, असा प्रश्‍न या दुष्काळी भागातील जनता विचारत आहे.
सध्या माढा मतदारसंघातील घडामोडींमुळे तेथील विद्यमान खासदार व माण-खटावच्या आमदारांचा जिल्ह्यात बोलबाला होताना दिसत आहेत. काँग्रेसच्या तिकिटावर दुसर्‍यांदा आमदार झालेले जयकुमार गोरे हे मित्रप्रेम पक्षापलीकडे निभावताना आपल्या भाजप प्रवेशाचे दावे फेटाळताना दिसत आहेत; परंतु थेट काँग्रेस जिल्हाध्यक्षपदावरून भाजपमध्ये उडी मारून खासदार झालेल्या रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी नीरा-देवघर योजनेचे माढा मतदारसंघाच्या हक्काचे बारामतीकडे वळवलेले पाणी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत पुन्हा माढा मतदारसंघात वळवण्यात यशस्वी झाले. हे तेथील शेतकर्‍यांच्या हिताचे झाले; परंतु राष्ट्रवादीकडून गतवेळी खासदार आणि आता भाजपवासी झालेल्या विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कारकिर्दीत तारळी, उरमोडी, टेंभू योजनांसाठी त्यांनी ठोस पाऊल उचललेले दिसले नाही. त्यामुळे जनता काहीशी नाराज होती; परंतु आता नीरा-देवघर प्रश्‍नी आक्रमक झालेले खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आ. जयकुमार गोरे हे टेंभू पाणी प्रश्‍नासाठी काय करतात याकडे कलेढोण, पाचवड, हिवरवाडी, कान्हरवाडी, मुळीकवाडी, तरसवाडी, गारुडी, गारळेवाडी, आगासवाडी, कटरेवाडी, पडळ, विखळे, कानकात्रे, औतरवाडी या  ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. येत्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याच्या इराद्यावर कलेढोणसह 16 गावे ठाम असून विद्यमान खासदार व आमदार कलेढोण परिसराला न्याय मिळवून देणार का, हे येत्या काळात पहावे लागेल.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: