Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मान्सूनपूर्व पावसाची सातार्‍यात हजेरी
ऐक्य समूह
Friday, June 14, 2019 AT 10:56 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 13 : मान्सूनपूर्व पावसाने सातार्‍यात आज हजेरी लावली. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आणि संध्याकाळी 6 वाजता पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. सायंकाळी झालेल्या पावसाने कोणतेही नुकसान झाले नाही. दरम्यान, सातारासह तालुक्यात मान्सूनने हजेरी लावल्याने बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावर्षी सातारा जिल्ह्यातील माण - खटाव, फलटण आणि कोरेगाव तालुक्याच्या काही भागात दुष्काळ पडल्याने पिण्याच्या पाण्यासह वापराच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. नैसर्गिक जलस्त्रोत आटल्यामुळे दुष्काळी भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. त्यातच यावर्षी वळीव पावसाने हुलकावणी दिल्यामुळे नागरिकांसह बळीराजा मान्सूनपूर्व पावसाच्या प्रतीक्षेत होता. गुरुवारी पहाटे सातारा शहरात तालुक्यात पावसाची एक मोठी सर आली. त्यामुळे आज दिवसभर हवेमध्ये गारवा होता. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यातच दुपारी 3 वाजता पावसाची आणखीन एक सर पडली. सायंकाळी 6 वाजता मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. येथील पोवई नाक्यावरील मंडईमध्ये काही प्रमाणात पावसाचे पाणी साचले. पोवई नाका, राजवाडा,  बस स्थानक आणि सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील रस्त्यांवर पावसाने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते. दरम्यान, सातारा तालुक्यात बळीराजाची मशागतीची कामे पूर्ण झाली असून तू पावसाच्या प्रतीक्षेत होता. त्याची प्रतीक्षा संपल्याने बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: