Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फसवणूक व सावकारी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
ऐक्य समूह
Friday, June 14, 2019 AT 10:59 AM (IST)
Tags: lo3
सातार्‍यातील तिघांना 21 लाखांचा गंडा; भिशी, रेसकोर्स व गुंतवणुकीचे आमिष
5सातारा, दि. 13 : सातार्‍यातील तिघांकडून भिशी, रेसकोर्सवर टेबलवर लावण्यासाठी खाजगी कंपनीकडे गुंतवणूक अशा कारणांसाठी तब्बल 21 लाख 44 हजार उकळून त्यांनाच चुना लावण्याचा प्रयत्न करणार्‍या सातार्‍यातीलच पाच जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणूक व सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीपैकी 2 पुण्यातील असून बाकी 3 आरोपी व फिर्यादी सातार्‍यातीलच असून यामुळे आर्थिक फसवणुकीचे आणखी प्रकरण पुढे आले आहे. दरम्यान, यातील शाहरुख फारुख बागवान यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी नीलेश विलासराव आपटे (वय 38), रा. शिवसत्य रेसिडेन्सी, माची पेठ, सातारा यांचा कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. आपटे व त्यांचे मित्र संतोष महाडिक व विशाल मेणकर यांचा ओळखीतून शाहरुख फारुख बागवान इतर तीन आरोपींशी संबंध आला. यातून आरोपींनी भिशीसाठी, रेसकोर्सवर टेबलवर लावण्यासाठी खाजगी कंपनीत गुंतवणुकीसाठी दुप्पट पैशाचे आमिष दाखवले. यातूनच मग नीलेश विलासराव आपटे यांनी 14 लाख 11 हजार, संतोष महाडिक यांनी 3 लाख 75 हजार रुपये व विलास मेणकर यांनी 3 लाख 58 हजार रुपये वेळोवेळी संशयित शाखरुख बागवान याच्या जुना मोटार स्टँडमधील गॅरेजमध्ये दिले आहेत. हा सर्व व्यवहार 2016 पासून ते दि. 13 जून 2019 पर्यंत झालेला आहे.
या कालावधीत भिशी व गुंतवणुकीसाठी संशयितांनी पैसे घेवून परत मोबदला देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यामुळे फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर नीलेश विलासराव आपटे यांनी स्वतः व मित्रांच्यावतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी खासगी सावकारी तसेच फसवणूक प्रकरणी आरोपी शाहरुख फारुख बागवान, फारुख बागवान, नोएब बागवान, तिघेही रा. चैतन्य अपार्टमेंट, गुरुवार पेठ, सातारा आणि अनिसा बागवान, आसिफ कासम बागवान, दोघे रा. एनआयबीएम रोड, कोंडवा, पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: