Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भारताची स्वतःच्या अंतराळ स्थानक निर्मितीची योजना : डॉ. के. सिवन
ऐक्य समूह
Friday, June 14, 2019 AT 10:56 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 15 जुलै रोजी ‘चांद्रयान-2’ मोहीम सुरू करणार असल्याची घोषणा केली असतानाच ही संस्था अंतराळात आणखी एक मोठे लक्ष्य गाठण्याच्या तयारीत आहे. भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक निर्मितीची योजना असून त्यासाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानावर ‘इस्रो’ मध्ये काम सुरू आहे. भारताच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान मिशन’चा हा विस्तार असेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी आज नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत दिली.
अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतर ‘गगनयान’ प्रकल्प सुरुच राहणार आहे.  भारताचे स्वत:चे अंतराळ स्थानक असावे, या योजनेवर इस्रो काम करत आहे. डिसेंबर 2021 पर्यंत अंतराळात माणूस पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. गगनयान मोहिमेद्वारे हे स्वप्न साकार होणार आहे. ठरवलेल्या वेळेत हे उद्दिष्ट आपण गाठू शकलो तर स्वबळावर अवकाशात अंतराळवीर पाठवणार्‍या देशांमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागेल.
‘चांद्रयान-2’नंतर भारताने शुक्र आणि सूर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्‍चित केले आहे. भविष्यात अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी भारताला स्वतःचे अंतराळ स्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत. त्यातील एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक असून दुसरे चीनचे अंतराळ स्थानक आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गगनयान प्रकल्पाची घोषणा मागील वर्षी केली होती. यावर्षी ‘चांद्रयान-2’ श्रीहरीकोटा येथून 15 जुलै रोजी मध्यरात्री चंद्राकडे झेपावणार आहे. प्रक्षेपणानंतर 6 किंवा 7 सप्टेंबर रोजी चांद्रयान- 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. हा चंद्राचा असा भाग आहे, की तेथे आतापर्यंत कुठलेच अवकाश यान उतरलेले नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: