Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाटण येथे गावठी कट्ट्यासह युवक जेरबंद
ऐक्य समूह
Saturday, June 15, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: lo1
सुमारे 2 लाखांचा ऐवज हस्तगत
5सातारा, दि. 14 : पाटण जुन्या बसस्थानक परिसरात गावठी कट्टा जवळ बाळगून फिरणार्‍या पाटणमधील दोन युवकांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जेरबंद केले. या युवकांकडून एक गावठी कट्टा, एक गोळी, मोटारसायकल, दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 67 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आकाश उत्तम कोळी (वय 23), रा. नवरत्न चौक, पाटण व सागर गौतम वीर (वय 24), रा. मूळगाव रोड, पाटण अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी   जिल्ह्यात बेकायदा शस्त्र बाळगणार्‍यावर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कार्यरत असताना पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांना त्यांच्या बातमीदाराकडून दोन इसम पाटण एस. टी. बसस्थानक, पाटण चौक व पाटण परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरत असल्याचे समजले. त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी उपनिरीक्षक गवसणे व त्यांच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
गवसणे व त्यांच्या पथकातील कर्मचार्‍यांना पाटणमध्ये सापळा रचला असता दोन संशयित इसम मोटारसायकवरुन संशयितरीत्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेवून झडती घेतली असता त्यांच्याकडे बॅगमध्ये एक गावठी कट्टा, एक गोळी आढळून आली. कारवाई पथकाने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील कट्टा, गोळी, मोटारसायकल, दोन मोबाईल असा एकूण 1 लाख 67 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत उपनिरीक्षक सागर गवसणे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, नागे, पोलीस नाईक मोहन नाचण, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, संतोष जाधव, कॉन्स्टेबल प्रवीण कडव, गणेश कापरे, धीराज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला. या पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांचे जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी अभिनंदन केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: