Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नीरा-देवघरच्या पाणी वाटपाला तत्कालीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विरोध का केला नाही
ऐक्य समूह
Saturday, June 15, 2019 AT 11:38 AM (IST)
Tags: re2
ना. रामराजे यांचा खासदारांना सवाल
5फलटण, दि. 14 :  नीरा-देवघरमधील पाण्याच्या 60/40 टक्के वापरास रामराजे जबाबदार असल्याची आवई उठवून खासदार दिशाभूल करत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा त्यापूर्वी उपमुख्यमंत्री असलेल्या विजयसिंह मोहिते (पाटील) यांनी या निर्णयाला विरोध का केला नाही याबाबत त्यांच्याकडे काय उत्तर आहे हे शेतकर्‍यांना सांगावे, असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
नीरा-देवघर या 11.5 टीएमसी क्षमतेच्या धरणाचे कालवे पूर्ण नसल्याने त्यामधील पाणी नीरा उजवा व डाव्या कालव्याद्वारे वितरित करण्यात येत आहे. त्याला खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी विरोध केल्यानंतर हे पाणी कालवे पूर्ण होईपर्यंत धरणाच्या लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाणी योजनांसाठी देण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव शासनाने मान्य करून तसे निर्देश दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित शेतकरी व पाणी वापर संस्थांच्या पदाधिकारी मेळाव्यात यावर सखोल चर्चा होवून मागण्यांचे निवेदन कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा यांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
नीरा-देवघर प्रकल्पाचे काम पूर्ण करताना बच्छावत आयोगाच्या निर्णयानुसार राज्याच्या वाट्याचे 594 टीएमसी पाणी नियोजित प्रकल्पाद्वारे ऑगस्ट 2000 अखेर अडवून त्याचा वापर झाला नाही तर त्यावरील राज्याचा हक्क जाणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा निर्धार होता. शासनाने त्याप्रमाणे नियोजित सर्व पाटबंधारे प्रकल्पांची कामे पूर्ण करून त्याचा वापर दाखविल्याने आयोगाने फेरवाटपात राज्याला 81 टीएमसी पाणी वाढवून दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील कायम दुष्काळी पट्ट्याला झालेल्या फायद्याचा विचार न करता, त्यासाठी प्रकल्पग्रस्त व लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी दिलेल्या योगदानाचा विचार न करता आयते हातात आलेल्या पाण्याचे राजकारण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल रामराजेंनी केला.       
वास्तविक आपण 2014 पर्यंत पाटबंधारे मंत्री होतो. त्यानंतर 60/40 टक्के वापराबाबत निर्णय पुन्हा झाला. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी कालवा सल्लागार समितीने या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यावेळी कोणीच विरोध केला नाही. मग आजच विरोध का? या निर्णयाने शेती व शेतकर्‍यांचे मोठे नुकसान तर होणार आहेच, त्याचबरोबर सुमारे 6 टीएमसी पाणी विनावापर राहणार असल्याचे निदर्शनास आणून देत  या निर्णयाचा खासदारांना पश्‍चात्ताप होईल, असे मत श्रीमंत रामराजे यांनी व्यक्त केले. नीरा उजवा कालव्यातून फलटण तालुक्यातील 36, माळशिरस तालुक्यातील 16/17 आणि पंढरपूर तालुक्यातील काही गावांना भाटघर-वीर धरणातील पाण्याबरोबर नीरा-देवघरचे पाणी गेली 10/12 वर्षे दिले जात असल्याने या बागायती क्षेत्रात उसासह अन्य पिकाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली. मूळच्या नियोजनाप्रमाणे नीरा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात 65 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत होते. त्यामध्ये जवळपास चौपटीने वाढ झाली असल्याचे निदर्शनास आणून देत शासनाने दि. 12 जून रोजी घेतलेल्या निर्णयामुळे आता या बागायती पट्ट्यातील गावांना मिळणारे नीरा-देवघरचे पाणी बंद होणार असल्याने तेथील पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका लक्षात घेतानाच नीरा-देवघरचे पाणी मात्र विनावापर राहणार असल्याचे विचारात घेण्याची आवश्यकता आहे. सदर पाणी गावडेवाडी, ता. खंडाळा येथील नियोजित उपसा सिंचन योजनेद्वारे धोम-बलकवडी प्रकल्पाच्या कालव्यात सोडण्याचा निर्णय झाल्यास तेथून नीरा-देवघरच्या लाभक्षेत्राला पाणी देता येणार आहे. त्याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना याबाबतची वस्तुस्थिती निदर्शनास आणून देवून शेती व शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि विनावापर राहणार्‍या पाण्याचा वापर सुरू होण्यासाठी विनंती करणार असल्याचे श्रीमंत रामराजे यांनी स्पष्ट केले. भाटघर, वीर धरणाच्या पाणी वापराची सिस्टिम गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम पद्धतीने, नियोजनपूर्वक सुरू असल्याने त्याबाबत शेतकरी समाधानी आहेत. अशा परिस्थितीत मंत्री महोदयांनी प्रशासनाचा अहवाल नाकारून स्टेबल असलेली ही सिस्टिम अनस्टेबल करण्याचा निर्णय घेतला असल्याने फलटण व अकलूज या मोठ्या गावांच्या पाणी पुरवठा योजना तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाणी पुरवठा योजना पाणी साठा कमी झाल्याने अडचणीत येणार आहेत. त्याचबरोबर नीरा-देवघरचे पाणी उपलब्ध होत असल्याने नीरा उजवा कालव्यावरील आठमाही क्षेत्रास प्रामुख्याने माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील पाणी देता येत होते. या निर्णयामुळे या क्षेत्राला उन्हाळी हंगामामध्ये पाणी देता येणार नाही कारण हे क्षेत्र नीरा-देवघरच्या लाभक्षेत्रात नाही याचाही विचार करावा लागणार आहे. आतापर्यंतचा बागायत पट्ट्यातील आवर्तन कालावधी 15 दिवसांनी कमी होवून उन्हाळी हंगामात 2 ऐवजी 1 रोटेशन देणे शक्य होणार असल्याने उसाखालील क्षेत्राला मोठा फटका बसण्याचा धोका त्यांनी निदर्शनास आणून दिला. आपल्यावर पुनर्वसनाच्या जमिनीबाबत करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्ट करत हे आरोप सिद्ध करण्याची मागणी करतानाच आरोपकर्त्यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून घेतलेले निर्णय योग्य होते का याचा त्यांनी  विचार करावा. ते स्वयंघोषित छत्रपती आणि आपण स्वयंघोषित महाराज आहोत. तथापि, महाराज म्हणून घेताना आपण लोकांनी केलेल्या प्रेमातून ते स्वीकारल्याचे स्पष्ट करत छत्रपतींचे घराणे आणि आपल्या घराण्याचे ऋणानुबंध व मागील पिढीतील संबंधांचा विचार करून आपण फारशी उत्तरे आतापर्यंत दिली नाहीत. तथापि, आता आपल्याकडे असलेल्या माहितीचा वापर करून उत्तरे देण्यास ही मंडळी भाग पाडत आहेत.  दुसरे खासदार आणि आमदार यांच्याबद्दलही वेळ आली तर बोलावेच लागेल आणि त्यासाठी आपल्याकडे पुरेशी माहिती आहे. आपण निवडणुकीत त्यांचे गुरू होतो. त्यावेळीच निवडणुकीनंतर त्यांची भूमिका बदलणार असल्याचे आपण स्पष्ट केले होते. आताही राष्ट्रवादीच्या बैठकीत त्यांच्या विषयीची भूमिका स्पष्टपणे मांडणार असल्याचे सूतोवाच श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: