Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ट्रेकर्सच्या शोध मोहिमेस तिसर्‍या दिवशी यश
ऐक्य समूह
Saturday, June 15, 2019 AT 11:26 AM (IST)
Tags: re1
स महेश रिटेचा मृत्यू संशयास्पद स शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होणार
5महाबळेश्‍वर, दि 14 : वेण्णा तलावात बुधवारी दुपारी बुडालेल्या महेश दादासाहेब रिटे (वय 30, रा. जामखेड, जि. अहमदनगर) याचा मृतदेह तिसर्‍या दिवशी दुपारी तलावातून बाहेर काढण्यात ट्रेकर्सच्या टीमला यश आले. दरम्यान मृतदेहाची अवस्था पाहता मृतदेहाच्या गळ्याभोवती लाल फास आवळल्याच्या खुणा, उजवा डोळा सुजल्यासह पाण्यामध्ये मृतदेह राहून सुद्धा शरीरामध्ये पाण्याचा थेंबही आढळून आला नसल्याने महेश पाण्यात बुडण्यापूर्वीच मृत झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे महेश सोबत असलेल्या तीन मित्रांवर संशयाची टांगती तलवार आहे.
अहमदनगर येथील जामखेड येथून महेश दादासाहेब रिटे (30), युवराज अर्जुन म्हेत्रे (32), अहमद इलियास शेख (36), वसिम तय्यब शेख (30) हे चार मित्र महाबळेश्‍वर येथे पर्यटनासाठी आले होते. दारूची पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत ते वेण्णा लेक येथे नौकाविहारासाठी गेले होते. नौकाविहार करतानाच महेश रिटे हा  तरुण बेपत्ता झाला होता. त्याच्या सोबतच्या मित्रांनी पोहण्यासाठी महेश याने तलावामध्ये उडी मारल्याचे सांगितले होते. त्या दृष्टीने येथील महाबळेश्‍वर व सह्याद्री ट्रेकर्स सोबतच पालिका कर्मचार्‍यांकडून शोध मोहीम सुरु होती. शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास तिसर्‍या दिवशी महेश याचा मृतदेह तपास पथकाच्या हाती लागला. मृतदेह हाती लागल्याचे समजताच बघ्यांची मोठी गर्दी वेण्णालेक परिसरात जमली होती. मृतदेह बघून महेशची आई व जवळचे नातेवाईक, मित्रांनी हंबरडा फोडला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी महेश याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविला. महेशच्या मृतदेहाची तपासणी केले असता त्याच्या गळ्याला तीन ते चार इंचाचा फास आवळल्यासारखा व्रण दिसत असून उजवा डोळा सुजल्याचे दिसत होते. तीन दिवस पाण्यामध्ये असून देखील महेश याचा मृतदेह पाण्याने फुगला नव्हता. त्यामुळे महेश याचा मृत्यू पाण्यात बुडण्यापूर्वीच झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महेश याचे तीन मित्र संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. दुसरीकडे हे प्रकरण घात, की अपघात? याचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. महेश याचे नातेवाईक व मित्र मंडळी गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्‍वर येथे ठाण मांडून बसले होते. मात्र महेशचा तपास लागत नसल्याने सर्वांनीच आपल्या अश्रूंचा बांध रोखून धरला होता. शुक्रवारी मृतदेह पाहताच अश्रूंचा बांध फुटला आणि सर्वांनी एकच हंबरडा फोडला. आई व नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. तहसीलदार मीनल कळसकर, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी, पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड हे अधिकारी पूर्ण वेळ वेण्णालेक येथे उपस्थित होते.
ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीच नाही
महाबळेश्‍वर ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला. महेश याचे अनेक नातेवाईक व मित्र गेल्या दोन दिवसांपासून महाबळेश्‍वरमध्ये होते.
शवविच्छेदनानंतरच खरे कारण कळेल : कोंडूभैरी
मृत महेश याच्या मानेवर व गळ्यावर छोटा लाल रंगाचा व्रण असल्याचे दिसत आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या बाबतचा खुलासा होईल, असे पोनि कोंडूभैरी यांनी सांगितले.
नगराध्यक्षांकडून नातेवाईकांचे सांत्वन
नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, नगरसेविका स्नेहल जंगम, अफ्रिन वारुणकर, श्रद्धा रोकडे यांनी मृत महेशच्या नातेवाइकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
दोन नावांमुळे गोंधळ
मृताचे नाव महेश दादासाहेब रिटे असे असले तरी कागदोपत्री नाव महेश ज्ञानदेव सरोदे असल्याचे नातेवाइकांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: