Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहिवडी पोलीस ठाणे येथे बसमधील प्रवाशांची झडती घेताना पोलीस.
ऐक्य समूह
Saturday, June 15, 2019 AT 11:36 AM (IST)
Tags: re1
बसमध्ये चढताना प्रवासी महिलेचे सोळा तोळे दागिने लांबविले
दहिवडी बसस्थानकातील प्रकार, चोर सीसी कॅमेर्‍यात कैद
5दहिवडी, दि. 14 : दहिवडी बसस्थानकात आज दुपारी बसमध्ये चढताना महिलेचे सुमारे सोळा तोळे सोन्याचे दागिने व रोख 2 हजार 500 असे मिळून 2 लाख 58 हजारांचा ऐवज चोरट्याने लांबवला. चोरी करणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. तिचा शोध दहिवडी पोलीस घेत आहेत.
याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, मनीषा जालिंधर देशमुख, रा. विखळे, ता. खटाव, सध्या पिंपरी, ता. चिपळूण, जि. रत्नगिरी) या दोन मुले व आईसह चिपळूणला जाण्यासाठी दहिवडी बसस्थानकावर आल्या होत्या. दुपारी 1.15 च्या सुमारास अकलूज-चिपळूण या बसमध्ये त्या बसल्या. तिकीटाचे पैसे देण्याकरता पर्स काढण्यासाठी बॅगेत हात घातला असता पर्स व सुमारे सोळा तोळे सोन्याचे दागिने असणारा डबा व रोख 2 हजार 500 रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत प्रवाशांना तसेच वाहकाला सांगितल्यानंतर सदर बस दहिवडी पोलीस ठाण्यात आणण्यात आली. तेथे बसमध्ये सर्व प्रवाशांची, त्यांच्या सामानाची व रिकाम्या गाडीची झडती घेण्यात आली. परंतु काहीच सापडत नसल्याने दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी तत्काळ दहिवडी बसस्थानकात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मनीषा देशमुख यांच्या पाठीमागे काळा पंजाबी ड्रेस घातलेली व तोडाला पांढरा रुमाल बांधलेली, लहान मुलास घेऊन महिला बसमध्ये चढताना व परत जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सदर महिलेचा शोध घेण्यासाठी दहिवडी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.  चोरीची तक्रार मनीषा देशमुख यांनी दिली असून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित तपास करत आहेत.
तपासाची चक्रे वेगाने फिरली
आज दहिवडी बसस्थानकात घडलेल्या चोरीच्या प्रकाराची तत्काळ दखल घेत दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दहिवडी बसस्थानकात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले व तपासाची चक्रे वेगाने फिरवून सदर संशयित महिलेला ओळखणार्‍या साक्षीदाराकरवी तपास सुरु केला आहे. सदर महिला बसस्थानकातून बाहेर पडणार्‍या पिंगळी, बिदाल, फलटण या मार्गावर तत्काळ पथके रवाना करण्यात आली. प्रवाशांनी तसेच नागरिकांनी प्रवासादरम्यान रोख रक्कम, दागदागिने, मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवाव्यात, असे आवाहन प्रवीण पाटील यांनी केले आहे.
नागरिकांनी जागृत रहावे : पाटील
गुरुवार, दि. 13 रोजी टाकेवाडी व आंधळी परिसरात दोन इसम भांडी व दागिने पॉलिश करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवर फिरत आहेत. महिलांच्या अंगावरील दागिने लुटत आहेत. दोघे एकाच गाडीवर असून निळसर व गुलाबी रंगाचा शर्ट अंगात आहे, असा पोलीस पाटलांचा फोन आल्यावर तत्काळ सर्व पोलीस पाटील, ग्रामसुरक्षा दल यांना व्हॉट्सअ‍ॅपव्दारे संदेश देऊन सर्व संशयित मोटारसायकलची तपासणी करण्यात आली. नागरिकांनी जागृत राहून, असे काही संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: