Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
झारखंडमध्ये पोलीस पथकावर नक्षली हल्ला, पाच जवान शहीद
ऐक्य समूह
Saturday, June 15, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: na1
5सरायकेला (झारखंड), दि. 14 (वृत्तसंस्था) : झारखंडमध्ये पुन्हा एकदा मोठा नक्षलवादी हल्ला झाला आहे. सरायकेला खरसावन जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 5 पोलीस शहीद झाले आहेत. त्यात 2 उपनिरीक्षक आणि 3 पोलिसांचा समावेश आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, हल्ल्यानंतर पोलिसांकडील शस्त्रे घेऊन नक्षलवादी पसार झाले आहेत.
तिरुल्डीह पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुकडू येथे आठवडा बाजारादरम्यान पोलिसांचे पथक गस्तीवर होते. हे पथक तिथे पोहोचताच आधीपासूनच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला चढवला. नक्षलवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात पाच पोलीस जागीच शहीद झाले असून काही पोलीस जखमी असल्याचेही सांगण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक एम. एल. मीना यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: