Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सक्तीने वर्गणी मागितल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करणार : तेजस्वी सातपुते
ऐक्य समूह
Tuesday, June 18, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 17 : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदा दारुविक्री करणार्‍या दुकानांचे परवाने निलंबित केले जाणार. डॉल्बीचा दणदणाट झाल्यास साहित्य जप्त करुन कठोर कारवाई करणार. पर्यावरणाला बाधक कृत्ये झाल्यास गणेश मंडळावर गुन्हे दाखल करणार. सक्तीने वर्गणी मागितल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करणार असल्याचा रोखठोक इशारा जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला. दरम्यान, यंदाचे गणेश विसर्जन गतवर्षीच्या बुधवार नाका परिसरातच होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
येथील पोलीस करमणूक केंद्रात सोमवारी सायंकाळी गणेशोत्सव 2019 च्या निमित्ताने पहिली बैठक पार पडली. यावेळी महसूल, पोलीस, नगरपालिका, एमएसईबी, बांधकाम विभाग तसेच नगरसेवक, गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी गणेशोत्सवासंबंधी प्रशासनाने अगोदर अडीच महिने बैठकीचे आयोजन केल्याने अभिनंदन करण्यात आले. यावेळी अनेकांनी विविध प्रश्‍न उपस्थित केले. सातार्‍यातील खड्डे, वीजेचा प्रश्‍न, मिरवणूक मार्ग निश्‍चिती, मूर्तीची मर्यादित उंची, दारुबंदी, शाडूच्या मूर्तीचा आग्रह, अतिक्रमण, चेन स्नॅचर, पाकिटमार, गर्दुले, छेडछाडीचे प्रसंग, ध्वनीप्रदूषण व त्याबाबतची आचारसंहिता पालन, गणराया अ‍ॅवॉर्ड अशा विविध समस्यांबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. हे प्रश्‍न नगरसेवक धनंजय जांभळे, नरेंद्र पाटील, वर्षा देशपांडे, चिन्मय कुलकर्णी, प्रकाश गवळी, अंजली कुलकर्णी, श्रीकांत शेटे, मधुकर शेंबडे यांनी मांडले.
उपस्थितांनी प्रश्‍न मांडल्यानंतर सातारा नगरपालिकेच्यावतीने मुख्याधिकारी शंकर गोरे म्हणाले, गतवर्षीप्रमाणे यंदाचे गणेश विसर्जन बुधवार नाक्यावरील शेतामधील कृत्रिम तळ्यात होईल. पालिकेच्या अखत्यारीत जे प्रश्‍न आहे ते सर्व दूर केले जातील. टप्प्याटप्याने यासाठी मोहीम राबवली जाणार आहेे. मिरवणूक मार्गातील जे अतिक्रमण आहे त्यावर हातोडा मारला जाईल.       
यासाठी संबंधितांना प्रथम नोटिसा देणार तरीही अतिक्रमण काढले नाही तर पोलीस बंदोबस्त घेवून अतिक्रमण काढले जाणार. याशिवाय रस्त्यावरील खड्डे भरुन घेतले जातील. घरगुती गणेश विसर्जनासाठी भूविकास चौक, अण्णासाहेब कल्याणी शाळेसमोरील कृत्रिम तळे, दगडी शाळा या ठिकाणी सोय केली जाईल.
एमएसईबीच्यावतीने जितेंद्र माने म्हणाले, गणेशोत्सव कालावधीत वीजेची कुठेही अडचण येणार नाही. मिरवणूक मार्गाची पाहणी करुन ज्या अडचणी आहेत त्यावर अगोदरच तोडगा काढला जाईल. यंदा एमएसईबीचे तीन कंट्रोल रुम उभारले जातील. याबाबतचे संपर्क क्रमांक व माहिती दिली जाईल. तसेच चौकाचौकात एक अधिकारी व एक वायरमन तैनात केला जाईल. यामुळे विजेसंबंधी कोणतीही अडचण ठेवली जाणार नसल्याचे आश्‍वासन देण्यात आले.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या, गणेशोत्सव हा सण सामाजिक सलोखा दृढ व वृध्दिंगत करण्यासाठी आहे. गणेशोत्सव कालावधीत ज्या अडचणी येतात त्या सर्व मानवनिर्मित आहेत यामुळे पोलीस दलाकडून जे आवश्यक पोलिसिंग आहे ते उत्तमप्रकारे पार पाडले जाईल. गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावून त्याचे मोठे स्क्रीनही ठेवावेत असे आवहन केले. गणेशोत्सव कालावधीत कोणी सक्तीने वर्गणी मागत असेल त्याविरुध्द तक्रार दिल्यास खंडणीचे गुन्हे दाखल करणार असा स्पष्ट इशारा दिला. तसेच दारु पिवून कोणी आढळल्यास त्याला पोलीस ठाण्यात नेवून गुन्हे दाखल करणार. प्रसंगी संबंधितांना तडीपारही केले जाणार. यामुळे गणेशोत्सव कालावधीत कोणीही कायदा व सुव्यस्था हातात घेवू नये, अन्यथा कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, दरवर्षी गणेशोत्सवासंबंधी विसर्जनासह अनेक अडचणी असतात. यावर्षी गणेश भक्तांना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी अडीच महिने अगोदर बैठक बोलावण्यात आली आहे. विसर्जन गतवर्षीच्या ठिकाणी होणार आहे. अतिक्रमण व रस्त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला त्यांनी चांगलेच धारेवर धरले. तत्काळ सातार्‍यातील जे पेंडिंग विषय आहेत ते निकाली काढावेत व त्याचा रिपोर्ट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. ध्वनी प्रदूषण, पर्यावरणसंबंधी, दारुबंदी बाबत उल्लंघन झाल्यास त्याविरुध्द कठोर भूमिका घेवून गंभीर गुन्हे दाखल करणार असल्याचा गर्भित इशारा त्यांनी दिला. डॉल्बी, डीजेला बंदी राहील असे सांगत याबाबत स्वतंत्र डॉल्बी चालकांची बैठक घेण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले. निर्भया पथकाची कारवाई चांगली असून महिला, युवतींना त्याचा मोठा आधार आहे. यामुळे त्या पुन्हा कार्यान्वित ठेवाव्यात अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: