Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सोमवारपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात होणार दाखल
ऐक्य समूह
Tuesday, June 18, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: mn5
तीन दिवसात कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस
5मुंबई, दि. 17 (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पावसाचे वेध लागले असून येत्या तीन दिवसात कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 21 तारखेपर्यंत मान्सून कोकणात येईल आणि 24 जूनपर्यंत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असेही हवामान खात्याने सांगितले आहे. यापूर्वी 16 ते 18 जून या कालावधीत कोकण विभागात काही ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता.
अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असतानाच नैऋत्य मोसमी वार्‍यांची वाटचाल सुखकर होत आहे. कर्नाटकमध्ये पोहोचलेले मोसमी वारे महाराष्ट्रात पोहोचण्यास सध्या पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोणताही मोठा अडथळा निर्माण न झाल्यास दोन ते तीन दिवसात त्याचे राज्यात आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता.
राज्याने यंदाच्या उन्हाळी हंगामात तीव्र चटके सहन केले आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. बहुतांश ठिकाणी दुष्काळी स्थिती आहे.     
राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस कोसळत असला  तरी दुष्काळी स्थिती दूर होण्यासाठी मोसमी पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र, यंदा मोसमी पावसासमोर विविध अडथळे निर्माण झाले आहेत. अंदमानात 18 मे रोजी दाखल झाल्यानंतर केरळमध्ये 1 जूनला अपेक्षित असताना तेथे मोसमी वारे उशिरा पोहोचले. त्यानंतर चांगली वाटचाल सुरू असताना चक्रीवादळाने त्यांची वाट रोखली. 13 ते 14 जूनला मोसमी वार्‍यांचा प्रवेश महाराष्ट्रात होण्याचा अंदाज असताना चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने त्यांची प्रगती थांबली होती. सद्य:स्थितीला चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. पुढील काही दिवसात ते ओसरणार आहे. त्यामुळे मोसमी वार्‍यांच्या पुढच्या प्रवासासाठी वाट मोकळी झाली आहे. मोसमी वार्‍यांचा सध्या उत्तरेकडील प्रवास सुरू आहे.
दक्षिण कर्नाटकात दाखल झालेल्या वार्‍यांनी मंगळुरू, म्हैसूरपर्यंत मजल मारली असून तमिळनाडूतील सालेम, कुड्डालोपर्यंत त्यांची प्रगती झाली आहे. त्रिपुरा, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागातही ते पोहोचले आहेत. बंगालच्या उपसागरावरूनही मोसमी वार्‍यांची वाटचाल होणार आहे. रविवारी सिक्कीम आणि पश्‍चिम बंगालच्या उत्तर भागात ते दाखल होणार असल्याचे हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले होते.
मराठवाड्यात धरणांमध्ये साठा केवळ 1.57 टक्के
मराठवाड्यातील दुष्काळाने धरणांनी तळ गाठलेलाच होता. आता केवळ 1.57 टक्के पाणीसाठा राहिला आहे. सध्या मराठवाड्यात पिण्यासाठी तीन हजार 492 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. मराठवाड्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्प मिळून 872 धरणे आहेत. मोठ्या 11 धरणांपैकी केवळ नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार धरणात 9 टक्के पाणीसाठा आहे. अन्य दहा धरणांमध्ये शून्य पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील 75 प्रकल्पांपैकी बहुतांश धरणे कोरडी पडली आहेत.
पाऊस लांबल्याने पश्‍चिम विदर्भात तीव्र टंचाई
दुष्काळी स्थितीमुळे पश्‍चिम विदर्भातील पाणी टंचाईची तीव्रता वाढत चालली असून नजीकच्या काळात मान्सूनची दमदार हजेरी न लागल्यास टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर भर पडण्याची भीती आहे. पश्‍चिम विदर्भात सद्यस्थितीत 42 तालुक्यां-मधील 409 गावांमध्ये 452 टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: