Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संभाजीनगर येथे 25 दिवसांचे अर्भक जाळण्याचा प्रयत्न
ऐक्य समूह
Tuesday, June 18, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 17 : संभाजीनगर येथील यशवंत व अहिरे कॉलनी परिसरातील सर्वोदय अपार्टमेंटच्या पार्किंग लगतच्या मोकळ्या जागेत चादरीत गुंडाळलेल्या पंचवीस दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रवींद्र  किसन शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून या घटनेने सातार्‍यात एकच खळबळ उडाली आहे.  पोलीस सूत्रांकडून व फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सर्वोदय अपार्टमेंटच्या पार्किंगलगत असणार्‍या मोकळ्या जागेत तेथील जमा झालेला कचरा जाळण्यासाठी काही महिला जमा झाल्या होत्या. तेथूनच काही अंतरावर एका जळालेल्या चादरीतून मानवी पाय बाहेर आलेला दिसल्याने महिलांनी घाबरून त्याची इतरत्र खबर दिली.  तेथील लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता पुरुष जातीचे साधारण पंचवीस दिवसाचे अर्भक चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत जाळण्यात आल्याचे दिसून आले.  या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन तेथील रहिवासी रवींद्र किसन शिंदे यांनी फिर्याद दिली.  शहर पोलीस ठाण्याचा फौजफाटा तत्काळ दुपारी बारा वाजता घटनास्थळी दाखल झाला. घटनेचा पंचनामा करण्यात येऊन अज्ञाताविरोधात 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        
 प्राथमिक अंदाजानुसार अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे.  मृत अर्भक तातडीने जिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले.  मात्र या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल शहर पोलिसांनी घेत तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.  अपार्टमेंटच्या पार्किंग क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ठोस काही धागेदोरे हाती येतील याची शक्यता धूसर आहे.  पोलीस हवालदार गुलाब जाधव या प्रकरणी तपास करत आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: