Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ईव्हीएम बंदीसाठी ‘वंचित’ची कराडात निदर्शने
ऐक्य समूह
Tuesday, June 18, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: re1
5कराड,दि. 17 : ईव्हीएम मशिनवर बंदी घालावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने कराड तहसील कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी ईव्हीएमची होळी करण्यात आली. ‘ईव्हीएम हटाव देश बचाव’  अशा घोषणा देण्यात आल्या.
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चास प्रारंभ झाला.  तेथून हा मोर्चा महात्मा फुले चौक, दत्त चौक, शाहू चौक मार्गे तहसील कार्यालयावर गेला. तेथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
अ‍ॅड. संभाजीराव मोहिते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ईव्हीएम विरोधात देशभर निदर्शने करण्यात येत आहेत. येणारी विधानसभा निवडणूक या पुढील सर्व सार्वत्रिक निवडणुका या मतपत्रिकेव्दारे व्हाव्यात, अशी आमची मागणी आहे. यामध्ये मतदार यंत्राचा वापर करण्यात येऊ नये. लोकसभा निवडणुकीत शेकडो मतदारसंघामध्ये मतमोजणी आणि झालेले मतदान यामध्ये टोकाची तफावत आढळून आलेली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने कमालीचे मौन पाळले असून ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे. लोकशाही निवडणुका निकोप वातावरणात व्हायच्या असतील तर त्या मतपत्रेव्दारेच व्हायला पाहिजेत, अशी आमची आग्रही मागणी आहे.
पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल सावंत म्हणाले, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनमध्ये हातकणंगले, सांगली, बीड, सोलापूर लोकसभा मतदारसंघात तफावत आढळून आली आहे. निवडणूक आयोगात काहीतरी वेगळे शिजत आहे. अमेरिका, जपान या प्रगत देशांनी ईव्हीएम नाकारले आहे. मग आपल्याकडेच हट्ट का? सरकारचा याला छुपा पाठिंबा आहे.  यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, भारिप बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश कांबळे, उत्तर तालुकाध्यक्ष संतोष किरत, महेश कटरे, दयाराम काळोखे, अ‍ॅड. पंडित गायकवाड, विकास मस्के, शैलेश मस्के, जयसिंग गोखले, महेश थोरवडे यांच्यासह भारिप बहुजन महासंघ, एमआयएम व अन्य संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी ईव्हीएमच्या प्रतीकात्मक मशिनची होळी करण्यात आली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: