Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा
ऐक्य समूह
Tuesday, June 18, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 17 (वृत्तसंस्था) : लोकशाहीत विरोधकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यांना किती मते मिळाली? ते आकडे किती आहेत याचा विचार विरोधकांनी सोडून द्यावा. अनेकदा अनेक विरोधी पक्षाचे खासदार अशा प्रकारे मतं मांडतात की त्यातून खूप काही चांगल्या गोष्टी आम्हालाही शिकायला मिळतात. तर्काच्या दृष्टीने बोलणार्‍या प्रत्येकाला संधी दिली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजपासून दुसर्‍यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारचे पहिले अधिवेशन पार पडते आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्याचवेळी त्यांनी विरोधकांचे महत्त्व अधोरेखितही केले.
 मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यापासून आज (सोमवारी) पहिल्यांदाच अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशातील जनतेने पुन्हा निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. देशाने आम्हाला पुन्हा एकदा संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचे आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे. सबका साथ, सबका विकास हे आमचे धोरण आहे. देशाच्या जनतेला ते भावले म्हणूनच आम्ही पुन्हा सत्तेवर आलो, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या पाच वर्षात अनेक जनहिताचे निर्णय संसदेत झाले. येत्या काळातही असेच निर्णय आम्ही घेऊ. सबका साथ सबका विकास हे आमचे लक्ष्य आहे. संसदेच्या सभागृहांमध्ये अनेक सदस्य असे आहेत जे खूप चांगले विचार, चांगले प्रस्ताव मांडतात. तर्कशास्त्राच्या दृष्टीने सरकारवर टीका केली तरीही संधी देण्यात येईल. लोकशाहीत विरोधकांची ताकद खूप महत्त्वाची असते. विरोधकांचा प्रत्येक शब्द आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, असेही मोदींनी म्हटले आहे. त्यांना किती आकड्यांमध्ये मते मिळाली याचा विचार त्यांनी सोडून द्यावा, असेही मोदी यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: