Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अर्थसंकल्प फुटला, विरोधकांचा सभात्याग !
ऐक्य समूह
Wednesday, June 19, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 18 (प्रतिनिधी) : विधानसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना त्याचवेळी अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यातील घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून जाहीर होत होत्या. याबद्दल जोरदार आक्षेप घेताना, अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेतून सभात्याग केला. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि त्यातील घोषणा समजून घेण्याचा सभागृहाचा आणि आमदारांचा अधिकार आहे. मात्र, अर्थमंत्र्यांनी सभागृहाचा अवमान केल्याचा आरोप करताना मुुख्यमंत्री व मुनगंटीवार यांनी सभागृहाची माफी मागावी अन्यथा अर्थमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे.
विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना विरोधकांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्विटर हँडलवरून या तरतुदी आधीच जाहीर झाल्या असल्याकडे लक्ष वेधत त्याची प्रतच सभागृहात फडकावली. परंतु अर्थमंत्र्यांचे भाषण सुरु असताना हरकत घेण्यास अध्यक्षांनी अनुमती दिली नाही. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग करून अर्थसंकल्पीय भाषणावर बहिष्कार घातला. नंतर यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विधानसभेचे गटनेते विजय वडेट्टीवार व उपनेते नसीम खान उपस्थित होते. काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळत अर्थसंकल्प मांडताना तो अगोदर सोशल मीडियावर   कधीच फुटला नव्हता. यापूर्वी असे कधीच घडलेले नाही. मात्र, राजकारणासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात फक्त योजना वाचून दाखवण्याचे काम केले आहे. यातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल, असे कोणतेच चित्र अर्थसंकल्पात दिसत नसून अडचणीत असलेल्या शेतकरी, कामगार, गरीब वर्गासाठी त्यांनी कोणत्याच घोषणा केलेल्या नाहीत, असा आरोप केला.
देणे नाही घेणे नाही, रिकामे तुणतुणे !
अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे जनतेला दाखवलेले लॉलीपॉप आहे. देणे नाही घेणे नाही, रिकामे तुणतुणे वाजवणे...अशी अर्थसंकल्पाची खिल्ली उडवत मतांचे दान मिळवण्यासाठी हा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. पावणेपाच वर्षांत एक रुपया वाढवून दिला नाही. या योजनेतील लोकांबरोबरच या सरकारने शेतकर्‍यांनासुद्धा फसवले असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ‘आकड्यांचा खेळ सारा, राज्याचा उडाला बोजवारा’...अंमलबजावणीत सारे तोकडे, घोषणांचा मात्र पाऊस पाडे...अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: