Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
भाजपचे ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष
ऐक्य समूह
Wednesday, June 19, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 18 (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोठ्या नावांवर फुली मारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांचे नाव निश्‍चित केले आहे. बीजू जनता दल व वायएसआर काँग्रेसने बिर्ला यांच्या नावाला पाठिंबा दिल्याने त्यांच्या नावाची घोषणा ही केवळ औपचारिकता उरली आहे.
बिर्ला हे राजस्थानमधील दक्षिण कोटा येथून दुसर्‍यांदा लोकसभेवर निवडून आले आहेत. यापूर्वी, ते तीनदा विधानसभा सदस्य देखील राहिले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत बिर्ला यांनी काँग्रेसचे रामनारायण मीणा यांचा 2 लाख 79 हजार मतांनी पराभव केला होता. बिर्ला यांची राजस्थानात पर्यावरणप्रेमी अशी ओळख आहे. ‘ग्रीन कोटा’ अभियानांतर्गत त्यांनी आजवर अनेक लोकांना वृक्षारोपणासाठी प्रेरित केले आहे. पर्यावरणाबाबत ते सतत जागरूक असतात. त्या संदर्भातील कार्यक्रमांमध्ये हिरीरिने सहभागी होतात.
पुन्हा धक्कातंत्र
लोकसभा अध्यक्षपदासाठी मनेका गांधी, राधामोहन सिंह, एस. एस. अहलुवालिया यांच्यासह अनेक नावांची चर्चा होती. मात्र, मोदींनी   पारंपरिक संकेतांना फाटा देत बिर्ला यांचे नाव निश्‍चित केले. सर्वसाधारणपणे लोकसभा अध्यक्षपदासाठी ज्येष्ठता विचारात घेतली जाते. मात्र, यापूर्वी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले मनोहर जोशी व दोन वेळा खासदार झालेले जी. एम. सी. बालयोगी यांनाही अध्यक्षपद देण्यात आले होते. 57 वर्षीय बिर्ला लोकसभेचे अध्यक्ष झाल्यास ते आठ वेळा खासदार राहिलेल्या माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची जागा घेतील.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: