Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
नाणार रायगड जिल्ह्यात जाणार !
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 11:03 AM (IST)
Tags: mn4
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत लेखी उत्तराद्वारे माहिती
5मुंबई, दि.19 (प्रतिनिधी) : शिवसेना व स्थानिकांच्या दबावामुळे रद्द केलेला रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प आता रायगड जिल्ह्यात होणार आहे. प्रश्‍नोत्तराच्या तासात उपस्थित केलेल्या नाणार प्रकल्पाबाबतच्या तारांकित प्रश्‍नाला दिलेल्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा परिसरात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
नाणार प्रकल्पाला शिवसेनेने व तेथील स्थानिक लोकांनी प्रखर विरोध केला होता. हा प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नकोच, अशी मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला प्रकल्प होणारच, अशी ठाम भूमिका घेतली होती. परंतु नंतर लोकसभेसाठी शिवसेना-भाजपची युती करण्याचा निर्णय झाल्यानंतर भाजपचीही भूमिका बदलली व नाणारचा प्रकल्प रद्द करण्यात आला. मात्र आज लेखी उत्तरद्वारे समोर आलेल्या माहितीप्रमाणे हा महत्त्वाकांक्षी तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकणातच पण रायगड जिल्ह्यात करण्याचा सरकारचा मानस असल्याचे व त्यादृष्टीने कामही सुरू झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग्रेसच्या नसीम खान, विजय वडेट्टीवार, अमीन पटेल आदी सदस्यांनी नाणारचा तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरुड व श्रीवर्धन या चार तालुक्यातील 40 गावांमध्ये उभारण्यात येणार असल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित केला होता. यासाठी भूसंपादन करण्याकरता अधिसूचना काढण्यात आली असून स्थानिकांचा त्याला विरोध असल्याकडे प्रश्‍नाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. याला दिलेल्या लेखी उत्तरात रायगड जिल्ह्यातील 40 गावातील 13 हजार 409 हेक्टर जमिनीवर एकात्मिक औद्योगिक वसाहत उभारण्याचे प्रस्तावित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सिडकोद्वारे ही औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार असून सिडकोचे नवनगर विकास प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भूसंपादनाची अधिसूचना जानेवारीत काढण्यात आली असून भूसंपादनाला स्थानिकांचा विरोध असल्याची कोणतीही बाब निदर्शनास आली नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: