Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रत्नागिरीच्या समुद्रात 10 चिनी बोटी
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: mn5
5मुंबई, दि. 19 (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याने 1 जून ते 31 जुलै या पावसाळी काळात मासेमारीला बंदी घातली आहे. या काळात समुद्र खवळलेला असतो आणि माशांच्या प्रजोत्पादनाचा काळही असल्याने मासे या काळात मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. या बंदीचे राज्यातील मच्छिमारही कसोशीने पालन करतात. त्यामुळे राज्यातील मासेमारी संपूर्ण बंद असते. या आदेशाचे उल्लंघन करून मासेमारी केल्यास बंदर खाते मासेमारी करणार्‍या बोटींवर कारवाई करते. मात्र, पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत रत्नागिरीच्या समुद्रात 10 चिनी बोटी मासेमारी करत असून देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली असल्याचा आरोप पर्ससेईन असोसिएशनचे अध्यक्ष गणेश नखवा यांनी केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी गणेश नखवा यांनी केली आहे. चिनी आणि परदेशी मासेमारी बोटींच्या अवैध मासेमारीमुळे वर्षाला सुमारे 6 बिलियन डॉलर्स आपण गमावत असून भारतीय मासेमारी उद्योगातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे, असा आरोप त्यांनी केला. ईएझेड क्षेत्रात अवैध मालवाहू जहाजांना 300 टन मासे भरण्यासाठी  मोबदला दिला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी राज्याचे मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण विंधळे यांच्याशी संपर्क साधला असता, रत्नागिरीच्या समुद्रात 10 चिनी बोटी आल्या असल्याचे ट्रेकिंगमध्ये आमच्या खात्याच्या अधिकार्‍यांना टेहळणी करताना आढळून आले. या बोटी आपल्या हद्दीत कशा आल्या याबाबत चौकशी केली असता वायू वादळात बचावासाठी आणि आश्रयासाठी या चिनी बोटी रत्नागिरी येथे आल्याची माहिती  या बोटींच्या खलाशांनी दिली. मात्र, त्यांचा उद्देश काय होता? त्या आपल्या हद्दीत का आल्या याबाबत चौकशी करण्यासाठी आम्ही भारत सरकारकडे तक्रार केली आहे. कोस्ट गार्ड याबाबत अधिक सखोल तपास करत आहेत, अशी माहिती विंधळे यांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: