Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यात बेकायदा पिस्तूलसह वावरणारा जेरबंद
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 19 : सातारा शहरात बेकायदा पिस्तूलसह वावरणार्‍या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. 66 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले असून त्याला पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. भूपेश संजय वारे (वय 20) रा. कालगाव, ता. कराड असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दि. 19 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना त्यांच्या बातमीदारांमार्फत माहिती मिळाली, की हिरवा रंगाचा टी-शर्ट, निळ्या रंगाची पँट परिधान केलेला एक संशयित इसम कराड येथून सातारा बस स्थानक येथे बसने येणार आहे. त्याच्याजवळ पिस्तूल आहे. ही माहिती मिळाल्यानंतर विजय कुंभार यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांच्या पथकाला संबंधित संशयित इसमावर कारवाई करण्याचे आदेश दिले. प्रसन्न जर्‍हाड यांनी मिळालेल्या आदेशाने सातारा बस स्थानक व पोवई नाका परिसरामध्ये सापळा लावला. मात्र संशयित इसम सातारा बस स्थानक येथे आला नाही. गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत असताना मंगळवारी रात्री 9. 15 वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते गोडोली जाणार्‍या रोडवरील पेंढारकर हॉस्पिटल समोर मिळालेल्या माहितीच्या वर्णनाचा इसम आढळून आला. संशयावरून त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 66 हजार रुपयांचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. पिस्तूल हस्तगत करून संशयितास पुढील कारवाईसाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकार्‍यांना बेकायदा शस्त्रास्त्रे बाळगणार्‍या इसमांची माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्‍हाड, पोलीस हवलदार सिद्धेश्‍वर बनकर, पोलीस नाईक विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, मुनीर मुल्ला, विक्रम पिसाळ, विशाल पवार, नीलेश काटकर आदींनी भाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: