Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल
ऐक्य समूह
Thursday, June 20, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: mn1
5पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) : चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणार्‍या नागरिकांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा संपली असून मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे. वायू चक्रीवादळाचा जोर ओसरल्यामुळे मान्सून येत्या दोन ते तीन दिवसात (21 अथवा 22 रोजी)  महाराष्ट्रात सक्रिय होईल,  अशी माहिती वरिष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिली.
वायू आणि फणी या चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रात दाखल होण्याच्या तयारीत असलेला मान्सून 12 दिवसांनी लांबणीवर गेला. यापूर्वी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी पुण्या-मुंबईसह महाराष्ट्र अनेक ठिकाणी कोसळल्या होत्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. तरीही  मान्सून मात्र 12 दिवसांनी लांबणीवर पडला होता. अखेर ही प्रतीक्षा संपली असून मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे. येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. मान्सून 1 जून रोजी केरळात तर 7 जूनला तळकोकणात दाखल होतो. मात्र, यंदा मान्सूनच्या वाटचालीत अडथळे निर्माण झाले. वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सून सुरुवातीला केरळात आणि नंतर कर्नाटकात खोळंबला होता.
मध्य महाराष्ट्र विदर्भासह राज्यातील अनेक ठिकाणी  23 तारखेपर्यंत पाऊस पडण्याचे संकेत आहेत. 24 तारखेपर्यंत विदर्भ मराठवाड्यासह सर्वत्र जोरदार पाऊस होईल तर पंचवीस तारखेला  राज्यात सर्वत्रच मान्सून बरसेल, असाही अंदाज आहे.  कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र पाऊस बरसणार आहे. इतकेच नाही तर कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता असून विदर्भातही अतिवृष्टीचे संकेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे 22 ते 27 जून म्हणजेच पाच दिवसात राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. विशेषत: पुण्यात या पाच-सहा दिवसात चांगला पाऊस पडेल. धरणातील पाणी साठा वाढू शकतो, असाही अंदाज आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: